भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) पुन्हा आपले वर्चस्व राखण्यासाठी उत्सुक असलेल्या एन. श्रीनिवासन यांची बाजू वरचढ झाली आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. १७ डिसेंबर रोजी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
चेन्नई येथे मंगळवारी बीसीसीआयच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘पूर्व विभागाच्या सर्व सहा संघटनांनी श्रीनिवासन यांना पाठिंबा दिला आहे.’’
बीसीसीआयच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘माजी अध्यक्ष शरद पवार हे जरी अध्यक्षपदासाठी इच्छुक असले तरी त्यांना फारशी संधी नाही. त्यांच्याबाबत फारसे कोणी उत्सुक दिसत नाहीत.’’
बीसीसीआयची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी घेण्याचे ठरॉिवले होते. त्या वेळी बैठकीला उपस्थित राहण्याचा पवार यांचा मनोदय होता. मात्र आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यानंतर तेही फारसे उत्सुक नाहीत, असे समजते.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असताना दालमिया यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. दालमिया हे श्रीनिवासन यांना पाठिंबा देण्याच्या विचारात नव्हते, मात्र आता त्यांनी आपला विचार बदलला असून श्रीनिवासन यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनिवासन यांना मुदगल समितीने ‘क्लीन चीट’ दिल्यामुळे त्यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच पूर्व विभागाच्या पाठिंब्यामुळे त्यांची पुन्हा अध्यक्षपदी येण्याची संधी वाढली आहे.

Story img Loader