अर्जुन पुरस्कार विजेता बॉक्सिंगपटू जय भगवान लाच प्रकरणी निलंबित

ऑलिम्पिक पटू व अर्जुन पुरस्कार विजेता बॉक्सिंगपटू जय भगवानने हरयाणा पोलिसांत निरीक्षकपदी नोकरी करत असताना हिसार जिल्ह्य़ातील आदमपूर मंडी येथील व्यापाऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच घेतली. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले.

‘‘जय भगवानला पोलीस उपअधीक्षक भगवान दास यांच्या चौकशी अहवालानंतर निलंबित करण्यात आले असून हिस्सारचे पोलीस अधीक्षक सतेंदर गुप्ता यांनी चौकशी समिती नेमली होती,’’ असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी एका पोलिसालाही निलंबित केले आहे. जय भगवानने २०१० साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ६० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले होते. लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेचे त्यान दोन वेळा जेतेपद पटकावले आहे. २०१४ साली त्याला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता.

मुकेश गोयल या व्यापाऱ्याने असा आरोप केला की, ‘‘जय भगवान व काही पोलीस आपल्या दुकानात ३१ ऑगस्टला आले व भाऊ रवी इतर चार जणांना जुगाराच्या आरोपाखाली पकडून नेले व नंतर भगवानने त्यांना सोडण्यासाठी एक लाखाची लाच मागितली, नंतर अनिल गोयल या व्यापाऱ्यामार्फत पैसे दिले असता त्यांची सुटका करण्यात आली.’’

जय भगवान यांची या तक्रारीनंतर बदली करण्यात आली होती. यापूर्वी हरयाणाचा बॉक्सर व ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंह हा पंजाबमधील अमली पदार्थ प्रकरणात सापडला होता, पण नंतर तो निर्दोष असल्याचे सांगण्यात आले होते.

Story img Loader