फिफा विश्वचषक २०२२ मध्ये अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावणारा कर्णधार लिओनेल मेस्सीचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. भारतातही त्यांची लोकप्रियता खूप आहे. काही प्रसिद्ध सेलिब्रिटीही या करिष्माई खेळाडूचे चाहते आहेत. या सेलिब्रिटींमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचेही नाव आहे. नुकतेच अर्जेंटिनाच्या कर्णधाराने जय शाहला एक खास भेट दिली आहे, या भेटवस्तूचा फोटो आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आणि माजी खेळाडू प्रज्ञान ओझाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
खरं तर, स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बीसीसीआय सचिव जय शाह यांना आपली स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली आहे. जय शाहसोबतच्या या जर्सीचा फोटो पोस्ट करत प्रज्ञान ओझाने लिहिले, “GOAT ने जय भाईसाठी शुभेच्छा आणि स्वाक्षरी असलेली मॅच जर्सी पाठवली आहे! किती नम्र व्यक्तिमत्व. मलाही अशी एखादी अशी एक जर्सी मिळेल अशी आशा आहे… लवकरच.”
शुक्रवारी अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता कर्णधार मेस्सीने आपली स्वाक्षरी केलेली जर्सी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांना पाठवली. भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझाने भेट दिलेल्या जर्सीसोबत शाह यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ओझा यांची पोस्ट पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाली. स्पर्धेच्या इतिहासातील तिसरे विश्वचषक जिंकल्याबद्दल जय शाह यांनी अर्जेंटिनाचे अभिनंदन केले. विश्वचषक फायनलच्या दिवशी, शाह यांनी ट्विटरवर लिहिले, “फुटबॉल हा एक अविश्वसनीय खेळ आहे! दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली, परंतु अर्जेंटिनाने त्यांचा तिसरा #FIFAWorldCup जिंकल्याबद्दल अभिनंदन! एक नेत्रदीपक विजय.”
लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने या महिन्यात अंतिम फेरीत गतविजेत्या फ्रान्सचा पराभव करून ३६ वर्षांनंतर फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदासह मेस्सीने विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले. यापूर्वी मेस्सीने आतापर्यंतच्या कारकिर्दीत विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले नव्हते. ३५ वर्षीय खेळाडूने स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तीन सहाय्यांसह सात गोल केले. या चमकदार कामगिरीसाठी त्याला गोल्डन बॉल देण्यात आला. अर्जेंटिनाचा हा फॉरवर्ड दोन गोल्डन बॉल पुरस्कार जिंकणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला, त्याने यापूर्वी २०१४ विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.