बंगळुरू बुल्सवर ३०-२१ अशी मात; पुणेरी पलटणचा दिल्लीवर विजय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जखमी असताना त्याने घरच्या मैदानातील पहिल्या सामन्यात संघात पुनरागमन केले, पहिल्या दहा चढायांमध्ये त्याला एकही गुण मिळवता आला नव्हता. सामना अटीतटीचा असल्याने प्रशिक्षकाने त्याला बाहेर बोलवण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्याला तो मान्य नव्हता. ज्यांना स्वत:च्या गुणवत्तेवर विश्वास असतो, त्या व्यक्ती कामगिरीच्या जोरावरच सारे काही सांगून जातात. प्रशिक्षकांचे न ऐकता ३५ व्या मिनिटाला त्याने चढाई मागून घेतली. आणि या चढाईत अद्भूत, अविश्वसनीय, अविस्मरणीय अशा खेळाची प्रचिती साऱ्यांना करून दिली. या चढाईत जसवीर सिंगने तब्बल पाच खेळाडूंना बाद करत जयपूर पिंक पँथर्सच्या बाजूने सामना झुकवला. प्रो-कबड्डी लीगमध्ये पाच खेळाडूंना एका चढाईत बाद करण्याचा विक्रम जसवीरने यावेळी रचला आणि संघाला बंगळुरु बुल्सविरुद्ध ३०-२१ असा सहज विजय मिळवून देण्याचा मोलाचा वाटा उचलला. या विजयासह जयपूरचा संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अन्य एका लढतीत पुणेरी पलटणने दबंग दिल्लीचा ३२-२२ असा पराभव करत चौथे स्थान पटकावले.

जयपूरचा कर्णधार नवनीत गौतम आणि जसवीर यांचे संघात पुनरागमन झाल्याने संघाचे मनोबल उंचावलेले दिसले. पण बंगळुरुचा संघही त्यांना कडवी झुंज देत होता. मध्यंतरापर्यंत जयपूरने १०-९ अशी नाममात्र आघाडी घेतली होती. सामन्याच्या २७ व्या मिनिटाला प्रीतम चिल्लरची पकड करत जयपूरने बंगळुरुवर पहिला लोण चढवत १७-१२ अशी आघाडी घेतली. यानंतर दोन्ही संघांमध्ये अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. पण जसवीरच्या नेत्रदीपक चढाईने विजयाचे माप जयपूरच्या पदरात टाकले. जसवीरच्या पकडीनंतर त्यानंतरच्याच मिनिटाला जयपूरने बंगळुरुवर दुसरा लोण चढवला.

पहिल्या सत्रात पुण्याकडून दमदार खेळ झाला. त्यांनी १९ व्या मिनिटाला दिल्लीवर लोण चढवत मध्यंतरापर्यंत १६-७ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रामध्ये दिल्लीचा संघ आक्रमक खेळत असला तरी पुण्याचा कर्णधार मनजीत चिल्लरच्या रणनितीने त्यांना शेवटपर्यंत आघाडी मिळवण्याची संधी दिली नाही.

आजचे सामने

तेलुगू टायटन्स वि. बंगळुरू बुल्स

जयपूर पँथर्स वि. पुणेरी पलटण

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २.३

वेळ : रात्री आठपासून