गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सपुढे मंगळवारी दबंग दिल्ली संघाने अक्षरश: शरणागती पत्करली. तब्बल पाच वेळा दिल्ली संघावर लोण चढवणाऱ्या जयपूरने ५१-२१ अशा शानदार विजयासह प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या राजेश नरवालने जयपूरच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
नवी दिल्लीच्या त्यागराज क्रीडा संकुलातील या सामन्यात यजमान दिल्लीकरांना काशिलिंग आडकेकडून विशेष अपेक्षा होत्या. दिल्लीकडून फक्त काशिलिंगनेच झुंजार वृत्तीने लढत दिली. त्याने चढाईचे ९ गुण (२ बोनस) मिळवले, परंतु त्याची सहा वेळा पकड झाली. जयपूरने १४व्या मिनिटाला पहिला लोण चढवल्यामुळे पहिल्या सत्रात त्यांनी १९-९ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात दिल्लीने अक्षरश: हाराकिरी पत्करली. २१व्या मिनिटाला जयपूरने दुसरा आणि लगेच दोन मिनिटांनी तिसरा लोण चढवला. मग ३१व्या आणि ३६व्या मिनिटाला अनुक्रमे चौथा आणि पाचवा लोण चढवला. राजेश नरवालने चढायांचे १५ गुण (१ बोनस) आणि पकडींचे ४ असे एकूण १९ गुण कमवले. कर्णधार जसवीर सिंगने आपल्या दर्जाला साजेशा खेळाचे प्रदर्शन करीत चढायांचे ९ गुण मिळवले. ‘‘राजेश आणि सोनू नरवाल यांच्यावर जयपूरची प्रमुख मदार आहे. त्यांनी अपेक्षेनुसार खेळ केल्यामुळे विजय मिळाला. आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाडय़ांवर संघाची दमदार कामगिरी झाली. उपांत्य फेरीत स्थान मिळवणे, हे आमचे एकमेव लक्ष्य आहे,’’ असे जसवीरने सामन्यानंतर सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा