जयपूर पिंक पँथर्स आणि यु मुंबा यांच्यातील सामन्याने गेल्या वर्षी प्रो कबड्डी लीगच्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला होता. याच दोन दिग्गज संघांमध्ये पहिल्यावहिल्या हंगामाचा अंतिम सामना रंगला आणि मुंबईच्या सरदार वल्लभभाई स्टेडियमवर जयपूर पिंक पँथर्सने विजेतेपदाला गवसणी घातली होती. वर्षभराने पुन्हा नवा साज, नवे नियम, नव्या आशा यांच्यासह प्रो कबड्डी लीगचा दुसरा हंगाम शनिवारपासून सुरू होत आहे. पहिलीवहिली लढत अर्थातच गतविजेते जयपूर आणि गतउपविजेते यु मुंबा यांच्यात होणार आहे.
यु मुंबाच्या संघाने गतवर्षी जयपूरला हरवून आपल्या मोसमाचा प्रारंभ केला होता. त्यानंतर हीच विजयी घोडदौड त्यांनी पुढे राखली होती. कर्णधार अनुप कुमार आणि शब्बीर बापूच्या चढाया यांचा त्यात सिंहाचा वाटा होता. मात्र हंगामाच्या उत्तरार्धात शब्बीर आणि महत्त्वाचा पकडपटू जीवा कुमार यांना दुखापती झाल्यामुळे मुंबईला अखेरच्या सामन्यांमध्ये झगडावे लागले होते. दुसरीकडे जयपूरची सुरुवात चांगली झाली नव्हती, मात्र आठ विजयांसह त्यांनी साखळीतील अव्वल स्थानासह उपांत्य फेरी गाठली होती. या दोन संघांमध्ये मागच्या हंगामात झालेल्या तीन सामन्यांपैकी एक जयपूरने, एक मुंबई जिंकला होता, तर एक सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे या तुल्यबळ संघांमध्ये पहिली लढत कोण जिंकणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पाकिस्तानी खेळाडू
मुंबई-पुण्यात खेळणार नाहीत
’सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या टप्प्यात पाकिस्तानी खेळाडूंना खेळवणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती लीगचे संयोजक मशाल स्पोर्ट्सच्या प्रवक्त्याने दिली.
’शिवसेनेच्या युवा सेनेने गुरुवारी स्टार स्पोर्ट्सच्या कार्यालयात आणि एनएससीआय क्लबला जाऊन पाकिस्तानी खेळाडूंना प्रो कबड्डी लीगमध्ये खेळवू नये, असा इशारा पत्राद्वारे दिला होता.
’सावधगिरी म्हणून पाकिस्तानी खेळाडूंना मुंबई आणि पुण्यात खेळवण्यात येणार नाही. भारतीय हौशी कबड्डी महासंघ आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मशाल स्पोर्ट्सने स्पष्ट केले.