आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम या ठिकाणी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा विश्वचषक स्पर्धेतला अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने सहा गडी राखून भारताचा पराभव केला आणि विश्वचषक स्पर्धेवर आपलं नाव कोरलं. या अंतिम सामन्यासाठी कपिल देव यांना बोलवण्यात आलं नाही. त्यावर आता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Latest Marathi news
आज अहमदाबादमध्ये जो भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला त्यासाठी विश्व विजेत्या संघाचे कप्तान सहभागी झाले होते. मात्र कपिल देव यांना या सामन्यासाठी बोलवण्यात आलं नाही.ज्याविषयी कपिल देव यांनीही खंत व्यक्त केली. त्या पाठोपाठ आता जयराम रमेश यांनीही यावरुन बीसीसीआयवर टीका केली आहे. काही महिन्यांपूर्वी महिला मल्लांनी पुकारलेल्या आंदोलनाला कपिल देव यांनी पाठिंबा दिल्याने त्यांना बोलवलं गेलं नाही का? असा प्रश्न आता जयराम रमेश यांनी X वर पोस्ट करत विचारला आहे.
काय म्हटलं आहे जयराम रमेश यांनी?
“कपिल देव यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी न बोलवणं सपशेल चुकीचं आणि अत्यंत दुर्दैवी आहे. बीसीसीआयने त्यांना या सामन्यासाठी बोलवलं नाही. विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होता. कपिल देव यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या महिला मल्लांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. कपिल देव यांच्या मनात जी गोष्ट असते ते ती करताता. त्यांनी महिला मल्लांना पाठिंबा दिल्यानेच त्यांना बोलवलं गेलं नाही का?” या आशयाची पोस्ट जयराम रमेश यांनी केली आहे.
कपिल देव काय म्हणाले?
दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी आज त्यांची व्यथा एका वृत्तवाहिनीवर व्यक्त केली. ते कॅमेऱ्यासमोर म्हणाले, “मी आणि माझ्या १९८३च्या संघातील सर्व सदस्यांना जर बोलावले असते तर अजून बरे झाले असते. पण आज ते इतके व्यस्त आहेत, त्यामुळे ते कदाचित विसरले असतील. माझ्या व्यतिरिक्त असे बरेच लोक आहेत, ज्यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. मला मान्य आहे की त्यांच्यावर कार्यक्रमाची खूप जबाबदारी आहे, त्यामुळे त्या गडबडीत कधीकधी लोक विसरतात.” आज दुपारपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.