आयपीएल २०२४ नंतर लगेचच जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्वचषक २०२४ साठी जगभरातील २० संघ सज्ज झाले आहेत. अनेक आयसीसी ट्रॉफीची जेतेपद आपल्या नावे असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आधीच आपल्या संघाची घोषणा केली आहे. पण आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने एक मोठा बदल केला आहे आणि IPL 2024 च्या हंगामात आपल्या विलक्षण स्ट्राइक रेटने फलंदाजी करणाऱ्या नव्या तरूण खेळाडूला संघात सामील केले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन खेळाडूंना संघात बदल करत सामील केले आहे. यात जेक फ्रेझर मॅकगर्क आणि अष्टपैलू मॅथ्यू शॉर्ट यांना संधी मिळाली आहे. हे दोन खेळाडूही आता ऑस्ट्रेलियन संघासोबत वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला रवाना होणार आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप संघात कोणाला मिळाली संधी?
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने जाहीर केले की जेक फ्रेझर मॅकगर्क आणि मॅथ्यू शॉर्ट यांचा ऑस्ट्रेलियाच्या १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आलेला नाही तर राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धा सुरू असताना कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास हे दोन खेळाडू त्याची जागा घेऊ शकतात.
अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला आयपीएल २०२४ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना डाव्या हाताला दुखापत झाली. यामुळे वॉर्नर आयपीएलच्या साखळी टप्प्याच्या उत्तरार्धात दिल्लीसाठी बहुतेक सामन्यांमधून बाहेर होता. आता, जर वॉर्नर वेळेत पूर्णपणे फिट झाला नाही किंवा टी-२० विश्वचषकादरम्यान त्याच्या दुखापतीची समस्या पुन्हा निर्माण झाली, तर त्याच्या जागी दुसरा सलामीवीर म्हणून जेक फ्रेझर संघासाठी उपलब्ध असेल. जर कोणत्या अष्टपैलू खेळाडूला दुखापत झाली तर मॅथ्यू शॉर्टही त्याची जागा घेण्यास तयार असेल.
ऑस्ट्रेलियाने फिरकी गोलंदाज तनवीर संघाला राखीव म्हणून संघात समाविष्ट केले होते. पण दुखापतीमुळे तो या यादीतून बाहेर पडला असून आता तो २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी अमेरिकेला जाऊ शकणार नाही. जेक फ्रेझरनेआयपीएल हंगामात दिल्लीसाठी जबदरस्त स्ट्राईक रेटने अनेक स्फोटक खेळी खेळल्या. जेक फ्रेझरने या मोसमात दिल्लीसाठी ९ सामन्यात २३४.०४ च्या स्ट्राइक रेटने ३३० धावा केल्या, त्यापैकी सर्वोत्तम खेळी ८४ धावांची होती. यामुळेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून त्याला ही मोठी संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा- RCB vs CSK: रिंकूसमोर खलनायक ठरलेला यश दयाल धोनीला मात्र पडला भारी, पाहा २० व्या षटकातील थरार
T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर आणि ॲडम झाम्पा.
ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह – जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि मॅथ्यू शॉर्ट.