Ranji Trophy Jalaj Saxena Most Successful All Rounder: सध्या रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. या सामन्यात केरळच्या जलाज सक्सेना मोठा इतिहास घडवला आहे. जलाज सक्सेना रणजी क्रिकेटच्या इतिहासातील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरला असून त्याने अशी कामगिरी केली आहे, जी आजवर कोणालाही जमली नाही. आज म्हणजेच बुधवार ६ नोव्हेंबर रोजी थुंबा येथे खेळवल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशविरूद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम आपल्या नावे केला आहे.
जलाज सक्सेना हा रणजी ट्रॉफीमध्ये ६ हजार धावा आणि ४०० विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. कोलकाता येथे मागील फेरीत ६ हजार धावांचा टप्पा त्याने गाठला होता आणि आता उत्तर प्रदेशविरुद्ध चौथी विकेट घेत त्याने या अनोख्या पराक्रमाची नोंद केली. ही त्याची रणजी ट्रॉफीतील ४००वी विकेट होती.
नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणाऱ्या केरळने भेदक गोलंदाजीच्या जोरावर उत्तर प्रदेशचे कंबरडे मोडले. सक्सेनाने यूपीचा डावखुरा फलंदाज नितीश राणाला स्टंप आऊट करून ४०० वा विकेट घेण्याचा पराक्रम केला. सक्सेनाने यानंतर लवकरच त्याची पाचवी विकेट घेतली. रणजी करंडक स्पर्धेत त्याने आतापर्यंत २९ वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. ही त्याची यूपीविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी आहे. यूपी हा १८वा संघ आहे ज्याविरुद्ध सक्सेनाने पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याने स्पर्धेतील विक्रमांच्या बाबतीत पंकज सिंगची बरोबरी केली आहे.
हेही वाचा – IPL Auction 2025: आयपीएल लिलावात पहिल्यांदाच या देशाच्या खेळाडूचा सहभाग; मुंबई इंडियन्सशी आहे खास कनेक्शन
४०० विकेट्स घेणारा एकमेव सक्रिय क्रिकेटपटू
३७ वर्षीय सक्सेना हा रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ४०० विकेट्सचा टप्पा गाठणारा केवळ १३वा गोलंदाज आणि ही कामगिरी करणारा एकमेव सक्रिय क्रिकेटपटू आहे. सक्सेनाने २००५ मध्ये मध्य प्रदेशमधून फर्स्ट क्लास करिअरची सुरुवात केली. २०१६-१७ हंगामात केरळला जाण्यापूर्वी त्याने एकूण १५९ विकेट घेतल्या आणि संघासाठी ४०४१ धावा केल्या. केएन अनंतपद्मनाभन यांच्यानंतर केरळचा दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. सक्सेना रणजी ट्रॉफीमध्ये संघासाठी २००० धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करूनही जलाजला भारतीय संघात संधी मिळाली नाही. गेल्या मोसमात देशांतर्गत ६०० विकेट घेणारा तो केवळ चौथा खेळाडू होता. त्याच्या आधी विनू मांकड, मदन लाल आणि परवेझ रसूल ही कामगिरी करू शकले आहेत.
हेही वाचा – IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
६३७ – राजिंदर गोयल
५३० – एस वेंकटराघवन
४७९ -सुनील जोशी
४४२ -आर विनय कुमार
४४१ – नरेंद्र हिरवाणी
४३७ – भागवत चंद्रशेखर
४१८ – व्हीव्ही कुमार
४१६ -शाहबाज नदीम
४०९ -पंकज सिंग
४०५ – साईराज बहुतुले
४०३ – बिशनसिंग बेदी
४०१ -उत्पल चॅटर्जी
४०१ – जलाज सक्सेना.
रणजी ट्रॉफीतील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू
जलाज सक्सेना – ६०२८ धावा, ४०१ विकेट्स
सुनील जोशी – ४११६ धावा, ४७९ विकेट्स
साईराज बहुतुले – ४४२६ धावा, ४०५ विकेट्स
मदन लाल – ५२७० धावा, ३५१ विकेट्स
ऋषी धवन – ४५७६ धावा, ३४२ विकेट्स
चंदू सरवटे – ४९२३ धावा, २८५ विकेट्स
विजय हजारे – ६३१२ धावा, २९१ विकेट्स
सर्वाधिक संघांविरुद्ध पाच विकेट घेणारे खेळाडू
१८ – जलाज सक्सेना
१८ – पंकज सिंग
१६ – सुनील जोशी, विनय कुमार, शाहबाज नदीम, आदित्य सरवटे