प्रतिस्पर्धी गोटातील म्होरक्याला लक्ष्य करायचे आणि जर त्यांनी हीच चाल आपल्यावर उलटवली तर मांडवली करायची, ही सध्याच्या युगाची रीत आहे आणि अशीच मांडवली इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांच्या प्रकरणामध्ये झाल्याची चर्चा सध्या क्रिकेटविश्वामध्ये रंगत आहे.
जेम्स अँडरसन म्हणजे भारतीय फलंदाजांसाठी सर्वात धोकादायक. त्यामुळे भारतीयांनी त्याला या प्रकरणात जाणूनबुजून लक्ष्य केल्याचा आरोप भारतीय संघावर करण्यात आला. त्यामुळे इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने रवींद्र जडेजाविरोधात तक्रार दाखल केली आणि त्याला सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी दंडही ठोठावला. बीसीसीआयला हा दंड पचनी पडला नाही. संघातील अव्वल अष्टपैलू खेळाडूला झालेला दंड काहीही करून त्यांना मागे घ्यायचा होता. त्यासाठी दोन्ही क्रिकेट संघांनी मांडवली करायचे ठरवल्याची चर्चा क्रिकेटविश्वात होताना दिसत आहे. भारतीय संघाने जडेजासाठी अँडरसनविरोधात नरमाईची भूमिका घेतल्याचेही म्हटले जात आहे. बीसीसीआयनेही आयसीसीच्या न्याय आयुक्तांचा निकाल पाहून निर्णय घेऊ, असे म्हणत तलवार म्यान केली आहे. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप..’ अशी भूमिका दोन्ही संघांनी घेत आपापल्या खेळाडूंना शिक्षेच्या जाचातून सोडवले आहे; पण एकंदरीत हे प्रकरण पाहता, यामध्ये इंग्लंडचाच विजय झाल्याचे म्हटले जात आहे.
बीसीसीआय आता पुढची दिशा ठरवणार

नवी दिल्ली : इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील वादाचे प्रकरण निकाली निघाले असले तरी निकाल पडताळून पाहत नाही तोपर्यंत पुढची दिशा ठरवणार नाही. निकाल येत्या दोन दिवसांमध्ये आम्ही पाहू आणि त्यानंतर पुढे काय करायचे हे ठरवू, असे बीसीसीआयने सांगितले. ‘‘येत्या दोन दिवसांत आयसीसीच्या न्यायआयुक्तांच्या निकालाची प्रत आम्हाला मिळेल. निकाल जाणून घेतल्यानंतर आम्ही पुढील दिशा ठरवू,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा