इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे प्रकरण क्रिकेटविश्वात गाजत असले तरी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला ही छोटी गोष्ट वाटत आहे. भारतीय संघाने यजमानांना धक्का देऊन अस्थिर करण्याचा हा प्रकार आहे. या छोटय़ा गोष्टीचा भारतीय संघ राईचा पर्वत करीत आहे. खेळापासून इंग्लंडच्या संघाचे लक्ष विचलित करण्याचा हा भारताचा प्रयत्न आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार मायकल वॉनने व्यक्त केले आहे.
‘‘हा प्रकार दयनीय आहे. अँडरसनची छोटी गोष्ट भारतीय संघ मोठी करून दाखवत असून हा दु:खद प्रकार आहे. कसोटी क्रिकेटच्या वातावरणावर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे,’’ असे वॉनने ‘दी डेली टेलिग्राफ’ या वर्तमानपत्रामध्ये लिहिले आहे. वॉनने याबाबत पुढे लिहिले आहे की, ‘‘हे प्रकरण दोन्ही संघांनी आपापसामध्ये सोडवायला हवे होते, पण तसे झाले नाही. हे प्रकरण आयसीसीकडे गेले आणि हीच दु:खद गोष्ट आहे.’’
पहिल्या कसोटी सामन्यात अँडरसनने जडेजाला आक्षेपार्ह भाषा वापरीत धक्काबुक्की केल्याचे भारतीय संघाने आयसीसीला कळवले होते. याचप्रमाणे इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने जडेजाविरोधात तक्रार केली आहे.
‘‘या प्रकरणात भारताला काळजीपूर्वक राहावे लागेल. त्यांच्याकडे अँडरसनविरोधात
सबळ पुरावे असल्याची त्यांनी खातरजमा करायला हवी,’’ असे वॉन म्हणाला.