वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटचा (४) त्रिफळा उडवून इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमधील ५०० बळी पूर्ण केले. हा पराक्रम करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जगातील सहावा गोलंदाज ठरला आहे.
लॉर्ड्सवर विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अँडरसनने हा टप्पा गाठला. ब्रेथवेटला बाद करताच अँडरसनच्या पराक्रमानंतर इंग्लिश संघाने त्याचे कौतुक केले, तर चाहत्यांनी उभे राहून मानवंदना दिली.
श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (८००), ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (७०८), भारताचा अनिल कुंबळे (६१९), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (५६३) आणि वेस्ट इंडिजचा कोर्टनी वॉल्स (५१९) या पाचशे बळी मिळवणाऱ्यांच्या पंक्तीत आता ३५ वर्षीय अँडरसन सामील झाला आहे.
विंडीजच्या पहिल्या डावातील १२३ धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव १९४ धावांत आटोपला. त्यामुळे इंग्लंडला ७१ धावांची आघाडी मिळाली. केमार रोचने ७२ धावांत ५ बळी घेतले. मग विंडीजची दुसऱ्या डावातही ३ बाद ६९ अशी अवस्था झाली होती.