उपांत्य लढतीत जपानची मात; आज पाकिस्तानशी कांस्यपदकाची लढत

गतविजेत्या आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने मंगळवारी आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य लढतीत जपानकडून ३-५ असा धक्कादायक पराभव पत्करला.

राऊंड रॉबिन लढतीत भारताने जपानविरुद्ध ६-० असा दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत त्यांना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. भारत आणि जपान यांच्यात आतापर्यंत १८ लढती होत्या. त्यापैकी भारताने १६ सामने जिंकले होते. भारतीय संघाने साखळी लढतीतही अपराजित राहात अग्रस्थान मिळवले होते. परंतु जपानने एका सामन्यात विजय मिळवला होता, तर एक सामना बरोबरीत सोडवला होता. परंतु उपांत्य लढतीत जपानच्या आक्रमक खेळापुढे मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारताचा निभाव लागला नाही. आता जपानची बुधवारी जेतेपदासाठी दक्षिण कोरियाशी गाठ पडेल, तर भारत-पाकिस्तान यांच्यात कांस्यपदकाचा सामना होईल.

जपानकडून शोटा यामाडा (पहिले मिनिट, पेनल्टी), रैकी फुजिशिमा (दुसरे मिनिट), योशिकी किरिशिटा (२९वे मिनिट), कोसेई कावाबे (३५वे मिनिट) आणि रायोमा ओका (४१वे मिनिट) यांनी गोल केले. याचप्रमाणे भारताकडून हार्दिक सिंग (१७वे, ५८वे मिनिट), उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (४३वे मिनिट) यांनी गोल केले.

सामना सुरू झाल्याची शिटी वाजल्यापासून आशियाई विजेत्या जपानने आक्रमक पवित्रा स्वीकारत पहिल्याच सत्रात सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. जपानने पहिल्या सहा मिनिटांत सहा पेनल्टी कॉर्नर मिळवले. यापैकी दोनचे गोलमध्ये रूपांतरण केले. पहिल्याच मिनिटाला यामाडाने पेनल्टीद्वारे गोल करताना कोणतीही चूक केली नाही. मग दुसऱ्या मिनिटाला फुजिशिमाने आणखी एक गोल पेनल्टीद्वारे साकारले.

दोन गोलने पिछाडीवर पडलेल्या भारताने दुसऱ्या सत्रात सावरण्याच्या इराद्याने खेळ केला. १७व्या मिनिटाला कर्णधार मनप्रीत सिंग आणि दिलप्रीत सिंगच्या साहाय्याने हार्दिकने मैदानी गोल केला. १९व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर लाभला. निलम संजीप एक्सेसचा हा प्रयत्न जपानच्या गोलरक्षकाने हाणून पाडला. जपानने भारतीय बचावावरील प्रतिहल्ले कायम राखत २९व्या मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवला. किरिशिटाने त्याचे गोलमध्ये रूपांतरण करीत मध्यांतराला जपानला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्रातही जपानने वर्चस्व गमावू न देता ३४व्या मिनिटाला कावाबने जपानची आघाडी ४-१ अशी करीत भारतावरील दडपण वाढवले. ४१व्या मिनिटाला केंटा टानाकाच्या साहाय्याने ओकाने पाचवा गोल झळकावला. दोन मिनिटांनी हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतरण केले. २-५ अशा पिछाडीनंतर भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु ते वाया गेले. सामन्याच्या उत्तरार्धात भारताला पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हार्दिकने त्याचे गोलमध्ये रूपांतरण करीत वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला.

जपानविरुद्ध हा निकाल अपेक्षित नव्हता. सामन्याच्या सुरुवातीला आम्ही बचावात्मक धोरण स्वीकारल्यामुळे जपानने दोन गोल साकारत दडपण निर्माण केले. कोणत्याही संघाला कमी लेखू नये, हा मोठा धडा या सामन्याद्वारे आम्हाला मिळाला. आता पाकिस्तानविरुद्धच्या कांस्यपदकाच्या लढतीसाठी सज्ज व्हायला हवे.

– मनप्रीत सिंग, भारताचा कर्णधार

Story img Loader