जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१८, २१-८ असा धुव्वा उडवत, आपल्या कोरियन ओपन स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. काही दिवसांपूर्वीच सिंधूने कोरियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओकुहारावर मात केली होती.
घरच्या मैदानावर खेळत असल्याने ओकुहाराचा खेळ बहरेल असा अंदाज सर्वांनी वर्तवला होता. मात्र पहिल्या सेटमध्ये हा अंदाज फोल ठरवत सिंधूने सेटमध्ये आघाडी मिळवली. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीच्या क्षणांमध्ये सिंधूकडे ७-४ अशी भक्कम आघाडी होती. यानंतर ओकुहाराने सिंधूला चांगली टक्कर देत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र मध्यांतरापर्यंत सिंधूने आपल्याकडे ११-९ अशी नाममात्र आघाडी कायम ठेवली होती. मात्र मध्यांतरानंतर ओकुहाराने सामन्याची सु्त्र आपल्या हाती घेत सिंधूला बॅकफूटवर ढकललं. एकामोगामाग एक पॉईंट मिळवण्याचा धडाका सुरुच ठेवत ओकुहाराने पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली. मात्र सिंधूने सामन्यात परत पुनरागमन करत बरोबरी साधली. मात्र अखेरच्या क्षणी आपला जोर लावत ओकुहाराने हा सेट २१-१८ अशा फरकाने आपल्या खिशात घातला.
दुसऱ्या सेटमध्ये ओकुहाराने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं. धडाकेबाज खेळ करत ओकुहाराने दुसऱ्या सेटच्या मध्यांतराला ११-४ अशी भक्कम आघाडी घेतली. मध्यांतरानंतर सिंधू सामन्यात कमबॅक करेल अशी सर्वांना आशा होती. मात्र ओकुहाराने ती आशा फोल ठरवत सिंधूला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. मध्यांतरानंतर सिंधूने सामन्यात केवळ ४ पॉईंट मिळवले. मात्र ओकुहाराने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत २१-८ अशा फरकाने दुसरा सेट जिंकत सिंधूचं आव्हान मोडीत काढलं.
दुसरीकडे पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या किदम्बी श्रीकांतने हाँगकाँगच्या हु यूनचा २१-१२, २१-११ असा पराभव केला. हु यूनने पहिल्या सेटमध्येच आक्रमक खेळाला सुरुवात करत सामन्यात आघाडी घेतली होती. आक्रमक खेळ करत हु यूनने पहिल्या सेटमध्ये सुरुवातीच्या क्षणांमध्ये ७-४ अशी आघाडी घेतली होती. मात्र यानंतर श्रीकांतने सामन्यात वेळीच पुनरागमन करत बरोबरी साधली. यानंतर सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत श्रीकांतने मध्यांतरापर्यंत ११-९ अशी आघाडी घेतली. यानंतर मात्र श्रीकांतने हु यूनला सामन्यात परतण्याची संधी न देता पहिला सेट २१-१२ अशा फरकाने जिंकला.
दुसऱ्या सेटमध्येही बरोबरीत सुरु असलेल्या खेळात श्रीकांतने आघाडी घेत सामन्यावर पुन्हा आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत श्रीकांतने सामन्यात ११-५ अशी आघाडी घेतली होती. यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्येच श्रीकांतने दुसरा सेट २१-११ अशा फरकाने जिंकत सामना आपल्या खिशात घातला.