टोक्यो : भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. महिला एकेरीत आकर्षी कश्यपला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.पुरुष एकेरीत श्रीकांतने चायनीज तैपईच्या चोऊ तिएन शेनचे आव्हान २१-१३, २१-१३ असे सहज संपुष्टात आणले.
आठव्या मानांकित प्रणॉयने देखील पहिल्या फेरीचा अडथळा सहज पार करताना चीनच्या ली शी फेंगचे आव्हान २१-१७, २१-१३ असे परतवून लावले. यंदाच्या हंगामात श्रीकांत, प्रणॉय यांचा प्रवास अडखळत सुरू होता. प्रणॉयने एक विजेतेपद मिळवले आहे. श्रीकांतला मात्र अभावानेच बाद फेरीपुढे जाण्यात यश आले आहे. आता श्रीकांत, प्रणॉय यांच्यातच उप-उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे.महिला एकेरीत आकर्षीला अनुभवी अकाने यामागुचीचे आव्हान पेलवले नाही. यामागुचीने २१-१७, २१-१७ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत मात्र ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद जोडीने जपानच्या सायाका होबारा-सुईझु जोडीवर ११-२१, २१-१५, २१-१४ असा विजय मिळवला.