टोक्यो : भारताच्या लक्ष्य सेनने जपानच्या कोकी वातानाबेला सरळ गेममध्ये नमवत जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ७५० दर्जा) उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. त्याच वेळी एचएस प्रणॉयला झुंजार खेळानंतरही पराभवाचा सामना करावा लागला.२०२१च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आणि जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असणाऱ्या लक्ष्यने वातानाबेला २१-१५, २१-१९ असे नमवले.
लक्ष्यचा सामना पुढच्या फेरीत इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित जॉनथन क्रिस्टीशी होणार आहे. दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असणाऱ्या प्रणॉयने अग्रमानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसेनकडून २१-१९, १८-२१, ८-२१ अशी हार पत्करली. तर, सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीची सलग १२ विजयांची मालिका खंडित झाली. त्यांना चायनीज तैपेइच्या ली यांग व वांग ची लान जोडीकडून १५-२१, २५-२३, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला.