पीटीआय, ओसाका : भारताच्या किदाम्बी श्रीकांतने जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी सनसनाटी विजयाची नोंद करताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. राष्ट्रकुल विजेता लक्ष्य सेन आणि सायना नेहवाल यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अपयशी ठरलेल्या श्रीकांतने जपान स्पर्धेची झोकात सुरुवात केली. श्रीकांतने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या ली झी जिया याचा २२-२०, २३-२१ असा पराभव केला. श्रीकांतने ३७ मिनिटांत विजय मिळविला. मलेशियाच्या लीविरुद्ध चार लढतींनंतर श्रीकांतचा हा पहिलाच विजय ठरला.
२१ वर्षीय लक्ष्यला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. पहिला गेम जिंकून लक्ष्यने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर लक्ष्यला खेळात सातत्य राखता आले नाही. जपानच्या केंटा निशिमोटोने रंगतदार लढतीत लक्ष्यवर १८-२१, २१-१४, २१-१३ असा विजय मिळवला. महिलांमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला दोन वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुचीला फारशी झुंज देता आली नाही. यामागुचीने पहिल्याच फेरीत सायनावर ३० मिनिटांत २१-९, २१-१७ अशी मात केली.
पुरुष दुहेरीतही भारतीय जोडय़ांना अपयश आले. ध्रुव कपिला-एमआर अर्जुन जोडीला कोरियाच्या चोई सोल ग्यू-किम वोन हो जोडीकडून २१-१९, २१-२३, १५-२१ असा चुरशीचा लढतीत पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद-ट्रिसा जॉली यांचेही आव्हान आटोपले. थायलंडच्या जोंगकोफान किटिथाराकुल-रिवदा प्रजोनजाई जोडीने भारतीय जोडीला २१-१७, २१-१८ असे पराभूत केले. मिश्र दुहेरीतही जुही देवांगण-वेंकट प्रसाद जोडीलाही पराभव पत्करावा लागला.