माजी क्रीडापटू आणि प्रशासक काओरी यामागुची यांचा आरोप
एपी, टोक्यो
करोना साथीच्या काळात टोक्योमध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या आयोजनासाठी जपानची कोंडी केली जात आहे, असा आरोप माजी ऑलिम्पिकपटू आणि जपान ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणी सदस्य काओरी यामागुची यांनी केला आहे.
जपानमधील नागरिकांचा ऑलिम्पिकसाठी होणारा कडवा विरोध आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी), सरकार आणि स्थानिक संयोजन समितीकडून धुडकावला जात आहे. विविध सर्वेक्षणांद्वारे जपानमधील ५० ते ८० टक्के नागरिकांचा ऑलिम्पिकला होत असलेला विरोध स्पष्ट होत आहे.
‘‘ऑलिम्पिक स्थगित करू शकत नाही, अशी जपानची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही पाऊल उचलल्यास ते आमच्यासाठी हानीकारक ठरेल. जपानमधील नागरिकांच्या मताला ‘आयओसी’कडून कोणतेही महत्त्व दिले जात नाही,’’ असे यामागुची यांनी सांगितले. तिने १९८८च्या ऑलिम्पिकमध्ये देशाला ज्युडो क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकून दिले होते. सध्या ती सुकुबा विद्यापीठात शिकवते.
‘‘ऑलिम्पिक हे कशासाठी आणि कुणासाठी आहे? ऑलिम्पिला आता अर्थच उरलेला नाही. ऑलिम्पिक रद्द करण्याची संधी आम्ही गमावली आहे, यावर माझा विश्वास आहे,’’ अशी टीका यामागुचीने केली. टोक्यो ऑलिम्पिकसाठी १५ अब्ज, ४० कोटी डॉलर खर्च अपेक्षित होता. परंतु आता हा खर्च दुप्पट झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे.