Jason Gillespie on Pakistan Cricket Board: पाकिस्तानच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर आपल्या पहिल्याच मुलाखतीत जेसन गिलेस्पीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबद्दल (PCB) मोठं वक्तव्य केलं आहे. पीसीबीला आपण कोच म्हणून राहू नये असे त्यांना वाटत होते. बोर्डाशी संवादाचा अभाव आणि सहाय्यक प्रशिक्षक टिम निल्सन यांची हकालपट्टी ही त्यांनी राजीनामा दिल्याची कारणं असल्याचे सांगितले.
गिलेस्पी आणि टिम नीलसनला पीसीबीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आणि त्यांना वाटले की ते योग्य दिशेने जात आहेत. कसोटी कर्णधार शान मसूद याच्याशी त्याचे चांगले संबंध होते आणि त्यांच्यातील प्रशिक्षक-खेळाडूचे नातेही घट्ट होते. ऑक्टोबरमध्ये इंग्लंडविरुद्ध २-१ असा विजय मिळवला, तर पाकिस्तान पहिल्या सामन्यात एक डाव आणि ४७ धावांनी पराभूत झाला. पराभवानंतर, गिलेस्पीने सांगितलं की ते एका चॅट ग्रुपमध्ये अॅड होते जिथे त्यांना एक मेसेज मिळाल की एक नवीन निवड समिती तयार होत आहे, ज्याचा गिलेस्पी हे कोच म्हणून भाग नसतील.
गिलेस्पी म्हणाले, “मला वाटते की मुख्य प्रशिक्षक म्हणून तुम्हाला तुमच्या बोर्डाशी स्पष्ट संवाद साधणं महत्त्वाचं असतं. टीम नील्सन यांना बोर्डाकडून सांगण्यात आले की त्यांनी यापुढे या पदावर काम करण्याची आवश्यकता नाही आणि मला याबद्दल काहीच सांगितले गेले नाही. मला असं वाटतं की गेल्या काही महिन्यांत घडलेल्या इतर बऱ्याच गोष्टींनंतर, कदाचित हाच तो क्षण असेल जेव्हा मला असे वाटले की त्यांना मी मुख्य प्रशिक्षक पदाच्या भूमिकेत संघाबरोबर असावे की नाही हे त्यांना स्पष्ट नव्हते.”
सामन्याच्या एक दिवस अगोदरच संघातील खेळाडूंची माहिती गिलेस्पी यांनी मिळत असे. त्यामुळे गिलेस्पी यांना प्रशिक्षक म्हणून आपली भूमिका कमी होत असल्याचे जाणवले. याचबरोबर निवडकर्ते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्याशी थेट संवाद होत नसल्याने आणि हळूहळू संघाबाबत सर्वच गोष्टींतून टाळल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
यापूर्वी गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या व्हाईट बॉल प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी ४ महिन्यांत संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. आता जेसन गिलेस्पीनेही राजीनामा दिला आहे. तर पाकिस्तान संघ आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टिम नील्सन यांना पदावरून काढल्यानंतर जेसन गिलेस्पीही पदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती.