आयपीएलचा १४ वा हंगाम सुरू होण्यासाठी आता १० दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिलाय. अशात सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसलाय. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून माघार घेतली आहे. पण, त्याच्याजागी हैदराबादने इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयला आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
फेब्रुवारी महिन्यात आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव चेन्नईत पार पडला. त्यावेळी लिलावात जेसन रॉयवर कोणत्याच संघाने लावली नव्हती. एकाही संघाने खरेदी न केल्यामुळे रॉय निराश झाला होता. नंतर त्याने सोशल मीडियावर “यंदा आयपीएलचा भाग नसणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया दिली होती. पण, आता मिशेल मार्शने माघार घेतल्यामुळे २ कोटी रुपये या बेस प्राइसमध्ये हैदराबादने रॉयला आपल्या संघात घेतले आहे.
Massive shame not to be involved in the @IPL this year but wanted to congratulate all the lads that did get picked up. Especially some of the high rollers. Going to be good to watch
— Jason Roy (@JasonRoy20) February 18, 2021
रॉयने २०१७ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत आयपीएलमध्ये तो गुजरात लायन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळलाय. आयपीएलच्या आठ सामन्यांमध्ये रॉयच्या नावावर १३३.५८ च्या स्ट्राइक रेटने केवळ १७९ धावा आहेत, यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यात रॉयने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या शानदार फॉर्मचा फायदा सनरायझर्स हैदराबादला होऊ शकतो.
दरम्यान, मिशेल मार्शने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतल्याचं सनरायझर्स हैदराबादने ट्विट करुन म्हटलंय. मात्र, करोनामुळे खेळाडूंसाठी बायो बबलमध्ये रहाणं अनिवार्य आहे, पण मार्शला बायो बबलमध्ये जास्त काळ राहायचे नव्हते, त्यामुळे त्याने माघार घेतल्याचं समजतंय.