Jasprit Bumrah becomes India’s eleventh T20 captain: टीम इंडिया सध्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेसाठी ३२७ दिवसानंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहला कर्णधार नियुक्त केले आहे. दरम्यान मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार २ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेत १-० ने अशी आघाडी घेतली. दरम्यान जसप्रीत बुमराहने आपल्या नेतृत्त्वात पहिला विजय नोंदवत एक खास पराक्रम केला आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन शानदार होते. बुमराहने शुक्रवारी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ११ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीसोबतच त्याने उत्तम कर्णधारपदही बजावले. बुमराहने २ विकेट्स घेत या सामन्याचा सामनावीर ठरला. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
बुमराहच्या नावावर हा खास विक्रम नोंदवला गेला –
वास्तविक, जसप्रीत बुमराह हा कर्णधार म्हणून पदार्पणात टी-२० मध्ये सामनावीर ठरणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. याआधी भारतीय टी-२० संघाचे १० कर्णधार आहेत. या सर्वांनी कर्णधारपदाचा पदार्पण सामना जिंकला आहे, परंतु कोणीही सामनावीर ठरला नाही. बुमराहने या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात ४ षटके टाकली, २४ धावांत २ बळी घेतले. बुमराहने सामन्याच्या पहिल्याच षटकात या दोन विकेट घेतल्या.
जसप्रीत बुमराह ठरला भारताचा ११ वा टी-२० कर्णधार –
याआधीही बुमराहने एका कसोटी सामन्याचे नेतृत्व केले होते, पण त्यात भारताचा पराभव झाला होता. कसोटीचे कर्णधारपद दिल्यानंतर निवडकर्त्यांनी बुमराहला भारतीय टी-२० संघाचा ११वा कर्णधार बनवले. बुमराहपूर्वी ७ विशेषज्ञ फलंदाज, दोन यष्टिरक्षक आणि एक अष्टपैलू टी-२० फॉर्मेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार बनला आहे.
जसप्रीत बुमराह भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार होणार पहिला गोलंदाज –
जसप्रीत बुमराहपूर्वी भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना देण्यात आले होते. आता टी-२० कर्णधारपदाच्या पदार्पणातील या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलायचे, तर केएल राहुलने एकाच सामन्यात कर्णधारपद भूषवले होते, ज्यामध्ये त्याने ६२ धावांची खेळी केली होती.