Jasprit Bumrah breaks Bishan Singh Bedi’s record : जसप्रीत बुमराहने बिशन सिंग बेदीचा विक्रम मोडला: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी खेळली जात आहे. संपूर्ण मालिकेत धुमाकूळ घालणाऱ्या जसप्रीत बुमराहची जादू या सामन्यातही दिसून येत असून त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या डावातील दोन्ही विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी बुमराहने उस्मान ख्वाजाला आपला बळी बनवले होते आणि आता दुसऱ्या दिवशी त्याने मार्नस लबूशेनच्या रूपाने मोठे यश मिळवले. या विकेटसह त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.
बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज –
जसप्रीत बुमराह आता ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत जसप्रीत बुमराहकडून ज्या प्रकारची कामगिरी अपेक्षित होती, ती त्याने पूर्णतः साकारली आहे. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत, बुमराहला इतर भारतीय वेगवान गोलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. परंतु त्याने एकट्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले.
जसप्रीत बुमराहने या मालिकेतील पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये ३० विकेट्स घेतल्या होत्या आणि कपिल देवचा विक्रम मोडला होता. यासह तो ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाज म्हणून भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. भारतासाठी या बाबतीत, तो एकूण यादीत बिशनसिंग बेदीच्या मागे होता, परंतु आता त्याने या दिग्गजांलाही मागे टाकले आहे. माजी भारतीय फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी १९७७/७८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या फिरकीची जादू दाखवली होती. त्यांनी ५ सामन्यांच्या १० डावांमध्ये २३.८६ च्या जबरदस्त सरासरीने ३१ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियातील एका कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
- जसप्रीत बुमराह – ३२ विकेट्स (२०२४-२५)
- बिशनसिंग बेदी – ३१ विकेट्स (१९७७-७८)
- बीएस चंद्रशेखर – २८ विकेट्स (१९७७-७८)
- ईएएस प्रसन्ना – २५ विकेट्स (१९६७-६८)
- कपिल देव – २५ विकेट्स (१९९१-९२)
हेही वाचा – IND vs AUS : विश्रांती सोडा, रोहित शर्मा स्क्वॉडमध्येच नाही? गौतम गंभीरच्या सहीनिशी यादीचा फोटो व्हायरल!
आता, जसप्रीत बुमराहने आतापर्यंत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-३५ मध्ये ५ कसोटी सामन्यांच्या ९ डावात १२.५० च्या सरासरीने ३२ विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटी मालिकेत भारतासाठी ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराहने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मार्नस लबूशेनला आऊट करताच इतिहास घडवला. भारताला आशा आहे की बुमराह ऑस्ट्रेलियन डावात आपली जादू दाखवत राहील आणि विरोधी संघाला किमान धावसंख्येपर्यंत रोखण्यात मदत करेल.