IND vs AUS 4th Test Day 1 Highlights In Marathi: भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत कांगारू संघाने पहिल्याच दिवशी ३११ धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात नवा सलामीवीर सॅम कोन्स्टासने विस्फोटर फलंदाजी करत १०० अधिक धावांचा टप्पा ऑस्ट्रेलियाला गाठण्यात मदत केली. कोन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत खराब सुरुवातीनंतर टीम इंडियाला पुनरागमन करून देण्यात मोठी भूमिका बजावली.
बुमराहने पहिल्या दिवशी सामन्यात ३ विकेट्स घेतले. बुमराहने प्रथम उस्मान ख्वाजाला बाद केले. यानंतर त्याने ट्रॅव्हिस हेडलाही बाद केलं. ट्रॅव्हिस हेडची विकेट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची होती. ट्रॅव्हिस हेडने या मालिकेदरम्यान टीम इंडियाविरुद्ध चमकदार कामगिरी केली आहे. तर मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली होती, त्यामुळे त्याची विकेट फार महत्त्वाची होती. या सामन्यात लबुशेन बाद झाल्यानंतर हेड फलंदाजीला आला. लॅबुशेन अर्धशतक करत वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
लबुशेन बाद झाल्यानंतर हेडने वॉशिंग्टनच्या षटकात पाचडॉट बॉल खेळले. त्यानंतर रोहित शर्माने प्लॅननुसार पुढच्या षटकात चेंडू बुमराहकडे सोपवला. बुमराहने पुन्हा आपली जादू दाखवली आणि दोन चेंडूंतच हेडला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हेडने नेहमीप्रमाणे चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला आणि चेंडू थेट जाऊन बेल्सवर आदळला आणि हेडला काही कळण्याआधीच तो क्लीन बोल्ड झाला.
उस्मान ख्वाजाच्या विकेटसह, जसप्रीत बुमराहने मेलबर्न क्रिकेट मैदानावर अनिल कुंबळेंचा विक्रम मोडला. या मैदानावर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेंच्या नावे होता आणि बुमराहने त्यांना मागे टाकलं आहे. त्यानंतर बुमराहने हेड आणि मिचेल मार्शला बाद करत ३ विकेट्स आपल्या नावे केले.
मेलबर्नमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स (कसोटी)
जसप्रीत बुमराह: सामने: ३*, डाव: ५ , १८ विकेट
अनिल कुंबळे : सामने : ३, डाव : ६, १५ विकेट
रविचंद्रन अश्विन : सामने : ३, डाव : ६, १४ विकेट
कपिल देव: सामने: 3, डाव: ६, १४ विकेट
उमेश यादव : सामने : ३, डाव : ६, १४ विकेट