IND vs AUS Jasprit Bumrah Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना गाबामध्ये रोमांचक वळणावर आहे. गाबा कसोटीचा पाचवा दिवस असून सामना ड्रॉ होणार की दोन्ही संघांपैकी कोणता संघ बाजी मारणार, हे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. बुमराहने पाचव्या दिवशी २ महत्त्वाच्या विकेट मिळवत दुसऱ्या डावाची संघाला चांगली सुरूवात करून दिली.
जसप्रीत बुमराहने पाचव्या दिवशी मार्नस लबुशेनची विकेट घेत ऑस्ट्रेलियन भूमीवर इतिहास घडवला आहे. आता बुमराहने टीम इंडियाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडत पहिलं स्थान गाठलं आहे. जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. गाबा कसोटीच्या दुसऱ्या डावात बुमराहने मार्नस लबुशेनची दुसरी विकेट घेतली. तर पॅट कमिन्सला बाद करत बुमराहने तिसरी विकेटही मिळवली.
हेही वाचा – IND vs AUS: “सॉरी सॉरी…”, आकाशदीपने आधी हेडला खाली वाकून उचलायला लावला चेंडू, मग मागितली माफी; पाहा VIDEO
बुमराह आता ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांच्या नावावर होता. ज्यांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर गोलंदाजी करताना ५१ विकेट घेतले होते. जसप्रीत बुमराहच्या नावावर आता ऑस्ट्रेलियात ५३ विकेट्स आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी फिरकीपटू दिग्गज अनिल कुंबळे आहे, ज्याने ऑस्ट्रेलियात ४९ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय आर अश्विन ४० विकेट्ससह चौथ्या स्थानावर कायम आहे.
हेही वाचा – IND vs AUS: बुमराह-आकाशदीपची ऐतिहासिक भागीदारी, ७७ वर्षांत ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी कामगिरी करणारी पहिलीच जोडी
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
जसप्रीत बुमराह- ५३ विकेट्स
कपिल देव- ५१ विकेट्स
अनिल कुंबळे- ४९ विकेट्स
रविचंद्रन अश्विन- ४० विकेट्स
बिशनसिंग बेदी- ३५ विकेट्स
गाबा कसोटीच्या दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी टीम इंडियाकडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने अवघ्या ३३ धावांत ५ विकेट गमावल्या. ज्यामध्ये जसप्रीत बुमराहने २, आकाश दीपने २ आणि मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. यानंतर हेड आणि कॅरीने संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि धावांची भर घातली. पण सिराजने हेडला झेलबाद करत सहावी विकेट मिळवली. यासह ऑस्ट्रेलियाने डाव घोषित करत भारताला विजयासाठी २७५ धावांचे आव्हान दिलं आहे.