Jasprit Bumrah captain of Cricket Australia Test team of year 2024 : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेतील चार सामन्यांनंतर यजमान ऑस्ट्रेलिया संघ २-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेत आतापर्यंत भारताकडून जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जैस्वाल यांनी शानदार कामगिरी केली आहे. मालिकेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सन्मानित केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी २०२४ वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे, ज्यामध्ये फक्त या दोन खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. त्याचबरोबर युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला संघात स्थान दिले. बुमराह २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे, त्याने यावर्षी १३ सामन्यांमध्ये १४.९२ च्या सरासरीने आणि ३०.१६ च्या स्ट्राइक रेटने ७१ विकेट्स घेतल्या आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुमराहबद्दल काय लिहिले?
जसप्रीत बुमराहबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लिहिले की, “या संघाचा तो एकमेव सदस्य आहे, ज्याने २०२४ मध्ये आपल्या संघाचे नेतृत्व केले (भारताला पर्थमध्ये विजय मिळवून दिला). बुमराहकडे एका सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. भविष्यात तुम्ही त्याला अधिक काम करताना पाहू शकता. हा वेगवान गोलंदाज सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चार कसोटींमध्ये ३० विकेट्स घेऊन आघाडीवर आहे.”
हेही वाचा – MS Dhoni : ‘मला PR ची गरज नाही कारण…’, माहीने सोशल मीडियाबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘कोणाचे किती…’
यशस्वी जैस्वालचीही वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात निवड –
बुमराह व्यतिरिक्त जैस्वालची यावर्षी फलंदाजीसह उत्कृष्ट कामगिरीसाठी सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. जैस्वालने १५ सामन्यांमध्ये (२९ डाव) ५४.७४ च्या सरासरीने नऊ अर्धशतके आणि तीन शतकांसह १,४७८ धावा केल्या आहेत. तो या वर्षात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.
यशस्वी जैस्वालबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लिहिले की, ‘भारताचा स्टार युवा फलंदाज २०२४ मध्ये एका अनुभवी खेळाडूप्रमाणे संयमाने खेळताना दिसला. फेब्रुवारीमध्ये जैस्वालच्या सलग द्विशतकांमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात कसोटी मालिका जिंकली, तर पर्थमध्ये डावखुऱ्या फलंदाजाची १६१ धावांची खेळीही निर्णायक ठरली. एका कॅलेंडर वर्षात भारतीय सलामीवीराने केलेल्या त्याच्या धावा सर्वात जास्त आहेत. त्याचे ३६ षटकार हे एका कॅलेंडर वर्षासाठी जगभरात एक नवीन बेंचमार्क आहे.’
हेही वाचा – Border Gavaskar Trophy : गौतम गंभीरला संघात हवा होता ‘हा’ खेळाडू; कुणी दिला नकार?
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघातील खेळाडूं :
ॲलेक्स कॅरी आणि जोश हेझलवूडच्या रूपाने ऑस्ट्रेलियाच्या दोन क्रिकेटपटूंना संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंडचा बेन डकेट, जो रूट आणि हॅरी ब्रूक, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र आणि मॅट हेन्री, श्रीलंकेचा कामिंडू मेंडिस आणि दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज यांनाही संघात स्थान मिळाले आहे.