IND Vs AUS 4th Test Day 4 Updates in Marathi: भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत चौथ्या दिवशी नितीश रेड्डी आणि मोहम्मद सिराज या जोडीने २१ चेंडू खेळून ११ धावा करत सर्वबाद झाले. यासह भारतीय संघ ३६९ धावा करून सर्वबाद झाला. यासह ऑस्ट्रेलियाला १०५ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीला उतरला आणि बुमराहने कॉन्स्टासला क्लीन बोल्ड करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली.
पहिल्या डावात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मोठी फटकेबाजी करत पदार्पणवीर कॉन्स्टासने अर्धशतकी खेळी केली होती. सामन्याच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार मारत चर्चेत आलेला सॅम कॉन्स्टस दुसऱ्या डावात बुमराहसमोर गडबडला. दुसऱ्या डावातील सातव्या षटकात त्याने जबरदस्त चेंडू टाकून बुमराहने कॉन्स्टासला बाद केले. सुरूवातीला सारखेच चेंडू टाकून कॉन्स्टासला सेट केलं आणि अचानक पुढे चेंडू टाकून थेट क्लीन बोल्ड करत भारतीय संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.
जसप्रीत बुमराहने विकेट घेतली की तो दोन हात वर करून फक्त सेलिब्रेशन करतो. बुमराहचं भन्नाट सेलिब्रेशन आपण फार कमी वेळेस पाहिलं आहे. पण यावेळेस मात्र कॉन्स्टासला क्लीन बोल्ड केल्यानंतर कॉन्स्टासला त्याच्या भाषेतच सेलिब्रेशन करत मैदानाबाहेर धाडलं. कॉन्स्टासची विकेट घेतल्यानंतर बुमराहने मैदानावर उपस्थित प्रेक्षकांना हातवारे करत जोरात चिअर करण्यास सांगितलं. बुमराहच्या या सेलिब्रेशनमागचं कारण म्हणजे कॉन्स्टास भारतीय डावात चाहत्यांना सतत हातवारे करून चिअर करण्यासाठी सांगत होता. बुमराहने त्याचं हे सेलिब्रेशन लक्षात ठेवत बाद झाल्यानंतर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे.
भारतीय संघाच्या गोलंदाजीने विभागाने दुसऱ्या डावात सुरूवातीपासूनच चांगली गोलंदाजी केली आहे. बुमराहने आणि आकाशदीपने चांगली सुरूवात योग्य लाईन आणि लेंग्थवर गोलंदाजी केली. अनेक चेंडू फलंदाजांच्या खूप बॅटच्या जवळून गेले आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलाच त्रास दिला आहे. रोहित शर्माबरोबर या सामन्याच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीही फिल्ड सेट करण्यासाठी मदत करताना सतत चर्चा करताना दिसत आहे. ज्याचा टीम इंडियाला फायदा होताना दिसत आहे. १७ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाने १ विकेट गमावत ४० धावा केल्या आहेत.