Jasprit Bumrah Viral Video IND vs AUS: सिडनी कसोटीत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. सध्या सर्वांच्या नजरा बुमराहच्या दुखापतीच्या अपडेटवर आहेत, बुमराह सिडनी कसोटीत दुसऱ्या दिवशी लंचब्रेकनंतर अचानक मैदानाबाहेर गेला. यानंतर दुसरा दिवस संपल्यानंतर १० षटकं टाकून जसप्रीत बुमराह मैदानाबाहेर गेला आणि त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले. पण आता ऑस्ट्रेलियाचा संघ सिडनी कसोटीत चांगल्या स्थितीत नसल्याने ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी बुमराहला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.
सिडनी कसोटीदरम्यान जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपला बूट काढून नीट करतो आणि परत घालताना दिसत आहे. यादरम्यान, बुटातून काहीतरी बाहेर पडते, या बूटातून बाहेर पडलेल्या वस्तूला सँडपेपर असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हीडिओमध्ये म्हटले जात आहे. अशा प्रकारे बुमराहवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आता बुमराहच्या या व्हायरल व्हीडिओमागचं नेमकं सत्य काय आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आम्ही या व्हीडिओची पुष्टी करत नाही.
हेही वाचा – IND vs AUS: ऋषभ पंतने वादळी अर्धशतकासह घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
बुमराहचा व्हीडिओ ऑस्ट्रेलियन संघाच्या काही चाहत्यांनी शेअर करत मोठा गैरसमज पसरवला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करून बुमराहच्या बूटमधून सँडपेपर बाहेर पडला का, असे विचारण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या संघाला जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने चांगलाच त्रास दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच फलंदाजाला बुमराहने फार काळ आपल्यासमोर टिकून दिले नाही. बुमराहने आतापर्यंत संपूर्ण मालिकेत सर्वाधिक ३२ विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहसह यजमान संघाचा नवा फलंदाज सॅम कॉन्स्टासने वाद घालण्याचा प्रयत्न केला, त्यालाही बुमराहने आपल्या गोलंदाजीने उत्तर दिले आहे.
भारत-ऑस्ट्रेलियातील सिडनीत सुरू असलेला पाचवा आणि शेवटचा सामना अतिशय रोमांचक वळणावर आहे. भारतीय संघाला दुसऱ्या डावात ६ विकेट गमावून केवळ १४१ धावा करता आल्या. जर संघाला मोठे लक्ष्य देण्यात अपयश आले तर पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची गरज भासेल.
पण समोर आलेल्या माहितीनुसार, बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. दुसऱ्या दिवशी अचानक मैदानाबाहेर जात तो स्कॅनसाठी पोहोचला होता. तिसऱ्या दिवशी तो फलंदाजीसाठी उतरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र गोलंदाजीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तो गोलंदाजी करेल की नाही हे आता त्याच्या दुखापतीवर अवलंबून आहे.