Jasprit Bumrah Fitness Update Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांचीही घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने देखील टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघाची निवड केली होती, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावाचाही समावेश आहे. मात्र जसप्रीत बुमराह २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकेल की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, बुमराहबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. दरम्यान, बुमराह बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पोहोचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो तिथे किमान तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचे स्कॅनही केले जाणार आहे. यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्सचे तज्ज्ञ आपला अहवाल राष्ट्रीय निवड समितीला सादर करतील. बुमराहला वैद्यकीय संघाकडून क्लीन चिट मिळाली तरच तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीचसाठी टीम इंडियाच्या घोषणेदरम्यान, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत बुमराहबद्दल महत्त्वाची अपडेट देखील दिली होती. अजित आगरकर म्हणाले होते की, बुमराहला पाच आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे आणि त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. म्हणजेच सर्व काही ठीक झालं तर बुमराह मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळू शकतो किंवा तो थेट चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला मैदानात उतरू शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही वनडे मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या शेवटच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह अचानक मैदानाबाहेर पडला. यानंतर तो सपोर्ट स्टाफबरोबर स्टेडियमबाहेरही गेला. त्यानंतर बुमराह पुन्हा गोलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही. जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. २०२३ मध्ये बुमराहने न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्चमध्ये पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. जून २०२२ मध्ये त्याला ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला बराच काळ मैदानाबाहेर राहावे लागले.