Jasprit Bumrah Top bowler in Test Rankings : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या उत्कृष्ट गोलंदाजीचा फायदा झाला आहे. आता जसप्रीत बुमराह कसोटीत क्रमवारीत जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. सध्या त्याचे ८८१ गुण आहेत. बुमराहने इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. आता बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल ठरणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने पहिल्या डावात ६ विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावातही बुमराहने ३ फलंदाजांना बाद केले होते.
अश्विग मागे टाकत बुमराहने रचला इतिहास –
भारतीय संघाचा स्टार गोलंदाज आणि कसोटी उपकर्णधार जसप्रीत बुमराहने त्याचा सहकारी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मागे टाकले आहे. बुमराहपूर्वी आर अश्विन कसोटीत नंबर वन गोलंदाज होता, पण आता ८८१ गुणांसह जसप्रीत बुमराह कसोटीत नंबर वन गोलंदाज बनला आहे. नवीन ताज्या कसोटी क्रमवारीनुसार आर अश्विन आता ८४१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा ८५१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही.
जडेजाला आयसीसी कसोटी क्रमवारीतही धक्का बसला –
आर. अश्विनशिवाय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यालाही ताज्या कसोटी क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, या ताज्या क्रमवारीपूर्वी जडेजा आठव्या स्थानावर होता, पण आता यानंतर तो दहाव्या स्थानावर घसरला आहे. त्याचवेळी इंग्लंडचा ४१ वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला एका स्थानाचा फायदा झाला असून तो आठव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय नॅथन लायन दहाव्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचला आहे. अश्विन, जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे भारताचे सर्वात महत्त्वाचे गोलंदाज आहेत, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : ”त्याने चांगली संधी गमावली…”, खराब फॉर्मशी झगडणाऱ्या श्रेयस अय्यरवर झहीर खान संतापला
केन विल्यमसन फलंदाजांमध्ये अव्वल –
कसोटीच्या फलंदाजी क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली असून पहिल्या कसोटीच्या दोन डावांत त्याने दोन शतके झळकावली आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ एका स्थानाच्या झेप घेऊन दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या जो रूटला भारताविरुद्धच्या दोन्ही कसोटीत खराब कामगिरीचा फटका बसला असून तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. किवी फलंदाज डॅरिल मिशेल चौथ्या आणि पाकिस्तानचा बाबर आझम पाचव्या स्थानावर कायम आहे. भारताच्या विराट कोहलीला दुसरी कसोटी न खेळण्याचा फटका बसला असून तो एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर आला आहे.
हेही वाचा – SA20 : काव्या मारनच्या संघाची सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये एन्ट्री! डरबन सुपर जायंट्सचा ५१ धावांनी उडवला धुव्वा
अष्टपैलू खेळाडूंमध्ये जडेजा अव्वल –
भारताचा स्टार रवींद्र जडेजा कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचवेळी अश्विन दुसऱ्या स्थानावर तर बांगलादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत इंग्लंडचा बेन स्टोक्स एका स्थानाने पुढे चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी अक्षर पटेलनेही एका स्थानाचा फायदा मिळवत पाचव्या स्थानावर पोहोचला. हैदराबाद कसोटीत विकेट्स घेण्याचा फायदा झालेला जो रूट दोन स्थानांनी घसरून सहाव्या स्थानावर आला आहे.
बुमराहने रचला इतिहास –
कसोटीपूर्वी बुमराह एकदिवसीय आणि टी-२० मध्येही नंबर वन गोलंदाज होता. अशा परिस्थितीत त्याने कसोटीत प्रथम क्रमांक मिळवून इतिहास रचला. तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा बुमराह जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कोणताही गोलंदाज अशी कामगिरी करू शकला नाही. एवढेच नाही तर बुमराह विराट कोहलीच्या खास क्लबमध्येही सामील झाला आहे. विराटशिवाय, तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान मिळवणारा तो आशियातील पहिला खेळाडू आहे. बुमराह हा कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज आहे.