ICC Code of Conduct Violation by Bumrah Jasprit : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला हैदराबादमध्ये सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने २८ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया मालिकेत ०-१ ने मागे पडली. त्याचबरोबर, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही नुकसान झाले. एवढेच नाही तर आता आयसीसीने भारताला आणखी एक धक्का दिला आहे. आयसीसीने अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर कारवाई केली आहे.
जसप्रीत बुमराहवर आयसीसीची कारवाई –
जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.१२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्या गुन्ह्याबद्दल त्याला अधिकृत फटकारण्यात आले आहे. ही घटना इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ८१ व्या षटकात घडली. बुमराहने जाणूनबुजून ऑली पोपच्या मार्गात अडथळा निर्माण केला होता. पोप जेव्हा एकेरी धाव घेण्यासाठी धावला, तेव्हा ही घटना घडली. त्यामुळे आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.१२ नुसार, जर एखादा खेळाडू दुसऱ्या खेळाडूशी किंवा अंपायरशी अनुचित शारीरिक संपर्कात आला तर त्याला दोषी घोषित केले जाते.
बुमराहच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जमा झाला –
जसप्रीत बुमराहला आयसीसीने फटकारले आणि सोडून दिले. त्याला दंड ठोठावण्यात आला नाही, कारण २४ महिन्यांतील हा त्याचा पहिला गुन्हा होता. मात्र, आयसीसीने कारवाई करत त्याच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला आहे. मैदानावरील पंच पॉल रायफल, ख्रिस गॅफनी, तिसरे पंच मारेस इरास्मस आणि चौथे पंच रोहन पंडित यांनी हा आरोप केला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा – IND vs ENG : पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का; आयसीसीची जसप्रीत बुमराहवर मोठी कारवाई
भारताचा २८ धावांनी दारूण पराभव –
ऑली पोप (१९६ धावा) च्या दमदमर शतकानंतर, नवोदित डावखुरा फिरकी गोलंदाज टॉम हार्टली (६२ धावांत ७ विकेट) याच्या जादुई स्पेलमुळे इंग्लंडने चौथ्या दिवशी भारतावर २८ धावांनी संस्मरणीय विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र हार्टलीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून यजमान संघ चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ६९.२ षटकांत २०२ धावांवर गारद झाला.