IND vs AUS Jasprit Bumrah Fifer: पर्थ कसोटीत टीम इंडियाचा भारतीय वेगवान गोलंदाज आणि कर्णधाराची भूमिका सांभाळणाऱ्या जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एक नवा विक्रम रचला आहे. पर्थ कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी बुमराहने ॲलेक्स कॅरीची विकेट घेत दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात १५० धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ७ गडी गमावून ६७ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलिया संघ १०४ धावांवर सर्वबाद झाला आहे.
पहिल्याच दिवशी बुमराहने ४ विकेट घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले होते. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच जसप्रीत बुमराहने इतिहास घडवला आहे. बुमराहने पहिल्याच कसोटी सामन्यात ५ विकेट घेत खळबळ उडवून दिली आहे. कसोटी क्रिकेटमधील त्याची ही त्या अकराव्यांदा ५ विकेट घेतले आहेत. एवढंच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर दुसऱ्यांदा कसोटी सामन्याच्या एका डावात अर्धा संघ बाद करण्याचा मोठा पराक्रम त्याने केला आहे. याआधी बुमराहने डिसेंबर २०१८ मध्ये मेलबर्न कसोटी सामन्याच्या एका डावात ६ विकेट घेण्याचा पराक्रम केला होता.
या ५ विकेट्समुळे बुमराहने आता कपिल देव यांच्या महान विक्रमाची बरोबरी केली आहे. सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सर्वाधिक वेळेस ५ विकेट घेण्याच्या बाबतीत बुमराहने आता कपिल देव यांची बरोबरी केली आहे. दोन्ही गोलंदाजांनी SENA देशांमध्ये ७ वेळा ५ विकेट्स घेतले आहेत. SENA म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे पहिले अक्षर घेऊन हा शब्द तयार झाला आहे.
SENA देशांमध्ये सर्वाधिक वेळेल ५ विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
७ वेळा – जसप्रीत बुमराह (५१ डाव)*
७ वेळा – कपिल देव (६२ डाव)
बुमराहने कसोटीत सर्वाधिक ५ विकेट घेण्याच्या बाबतीत इशांत शर्मा आणि झहीर खान यांची बरोबरी केली आहे. या तिन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी ११ वेळा कसोटी सामन्याच्या एका डावात ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. आता बुमराह या मालिकेत अजून एकदा ५ विकेट घेतल्यास इशांत शर्मा आणि झहीर खानला मागे सोडेल.