ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा मुकणार असल्याची शक्यता गुरुवारी व्यक्त करण्यात. बुमरा पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याचं जवळजवळ स्पष्ट झालं असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून म्हणजेच ‘बीसीसीआय’कडून देण्यात. या घोषणेनंतर अवघ्या २४ तासांच्या आत बुमराच्या जागी सध्या सुरु असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये कोणत्या खेळाडू संघात स्थान देण्यात येणार यासंदर्भातील माहिती ‘बीसीसीआय’ने दिली आहे.
टी-२० विश्वचषकाला तीन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक असून त्यापूर्वीच भारतीय संघाला बुमरा बाहेर पडल्याने मोठा धक्का बसला आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्येही बुमरा संघाचा सदस्य होता. मात्र आता दुखापतीमुळे तो या मालिकेतूनही बाहेर पडला असून त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं आहे. ‘बीसीसीआय’ने यासंदर्भातील घोषणा केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
‘‘बुमरा विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याच्या पाठीची दुखापत गंभीर आहे. या दुखापतीमुळे त्याला जवळपास सहा महिने मैदानाबाहेर राहावे लागू शकेल,’’ असं ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. परंतु ‘बीसीसीआय’ने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.