Jasprit Bumrah Injury Update Sydney test: सिडनी कसोटीत जसप्रीत बुमराह सामना सुरू असतानाच अचानक मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर ट्रेनिंग किटमध्ये स्टेडियम सोडताना दिसला. त्यावेळी बुमराहला मैदानावर काहीतरी त्रास होत असल्याची, अशी शक्यता वर्तवली जात होती. हे दृश्य पाहून सर्वच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. बुमराह भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आणि गोलंदाज या मालिकेत राहिला आहे, ज्याने सर्वाधिक ३२ विकेट घेतले आहेत. सिडनी कसोटीत लंच ब्रेक नंतर बुमराह सराव किट घालून कारमध्ये बसून गेल्याचे व्हीडिओ पाहायला मिळाले. यानंतर भारताच्या फलंदाजीदरम्यान बुमराह पुन्हा स्टेडियममध्ये आला.
जसप्रीत बुमराह सिडनी कसोटी सामना सुरू असताना टीम डॉक्टरसह स्कॅनसाठी मैदानाबाहेर गेला होता. दरम्यान, टीम इंडियाचा गोलंदाज प्रसिध कृष्णाने बुमराहच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट दिले आहेत आणि बुमराहला नेमका काय त्रास झाला होता, याबाबतही माहिती दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रसिध कृष्णा टीम इंडियाच्या वतीने पत्रकार परिषदेसाठी आला होता. तेव्हा कृष्णाला बुमराहबद्दल प्रश्न विचारण्यात आला. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत बोलताना प्रसिध कृष्णा म्हणाला, “जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत आहे. तो स्कॅनसाठी गेला होता. वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि स्कॅनचा निकाल आल्यावर पुढील गोष्टी आम्हाला कळतील.”
सध्याच्या घडीला भारतीय संघाकडे १४५ धावांची आघाडी आहे. तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरची जोडी मैदानात खेळत आहे. यानंतर जसप्रीत बुमराहचा फलंदाजासाठी पुढचा क्रमांक आहे. यापेक्षा जास्त या सामन्यात भारतीय संघाला जसप्रीत बुमराहची संघाचा महत्त्वाचा गोलंदाज म्हणून सर्वाधिक गरज आहे. भारतीय संघ जर मोठी धावसंख्या उभारू शकला नाही तर ऑस्ट्रेलियाला लवकर सर्वबाद करत संघाला विजय मिळवून देण्यात बुमराहचं मोलाचं योगदान असेल.
हेही वाचा – IND vs AUS: ऋषभ पंतने वादळी अर्धशतकासह घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात गोलंदाजी करणार नाही याबाबत अद्याप काही अधिकृत अपडेट समोर आलेली नाही. मात्र, या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करत ४ धावांची का होईना आघाडी मिळवली होती. या संपूर्ण मालिकेत बुमराहची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. त्याने ९ डावात एकूण ३२ विकेट घेतल्या आहेत.