Jasprit Bumrah Injury Update: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धे ५ जानेवारीला पूर्णविराम लागला. ५ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत टीम इंडियाला १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळला गेला, ज्याच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर तो गोलंदाजीसाठी पुन्हा मैदानात उतरला नाही. भारताला याचा चांगलाच धक्का बसला आणि तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने सिडनी कसोटी गमावली. पण आता बुमराहच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट समोर आले आहेत.
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत एका अहवालामध्ये माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुमराहची दुखापत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील वर्कलोडशी संबंधित आहे. BCCI वैद्यकीय पथक हे बुमराहला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी तयार करता येईल, याचे प्रयत्न करत आहे. कारण बुमराहची उपस्थिती संघासाठी मोठी जमेची बाजू असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहने १५३.२ षटकं टाकली आणि ३२ विकेट घेतले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटीआयने कळवले आहे की बुमराहच्या पाठीच्या दुखापत किती मोठी आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. खेळाडूंच्या दुखापतीची तीव्रता पाहून त्याची श्रेणीमध्ये विभागणी केली जाते. जर बुमराहची दुखापत पहिल्या श्रेणीतील असेल, तर त्याला पुनरागमन करण्यासाठी किमान दोन ते तीन आठवडे लागतील. बुमराहची दुखापत जर दुसऱ्या श्रेणीतील असेल तर त्याला पुनरागमनासाठी ६ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. जर का दुखापती तिसऱ्या श्रेणीतील असेल तर तिसरी श्रेणी म्हणजे गंभीर दुखापत आणि यासाठी कमीत कमी तीन महिने आराम तसंच पुनर्वसन या प्रक्रियेतून जावं लागतं.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका २२ जानेवारीपासून सुरू होत आहे. यानंतर ६ फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ २० फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडिया तणावात आहे. दुखापतीमुळे बुमराह १ महिन्यासाठी बाहेर राहिला तर तो इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. त्याची दुखापत अधिक गंभीर झाल्यास त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर जाण्याचा धोका आहे.