Jasprit Bumrah Left Sydney Ground for Scans: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या सिडनी कसोटीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्त्व करत आहे. जसप्रीत बुमराह या मालिकेतील सर्वाेत्कृष्ट गोलंदाज राहिला आहे आणि त्याने वेळोवेळी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संघाला सामन्यातही परत आणले आहे. मात्र खेळाच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने अचानक मैदान सोडले. बुमराहने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अप्रतिम गोलंदाजी करत १ विकेटही मिळवली. पण लंचनंतर बुमराह मैदानाबाहेर गेला असून एक मोठी अपडेट समोर येत आहे.
जसप्रीत बुमराह लंच ब्रेकनंतर मैदानावर दिसला नाही. तो सपोर्ट स्टाफसह मैदान सोडताना दिसला. यावेळी तो टीम इंडियाच्या मॅच जर्सीतही नव्हता. त्याने ट्रेनिंग किट घातली होती. ज्यानंतर जसप्रीत बुमराह काहीशा अडचणीत असल्याचे मानले जात आहे. याशिवाय तो मैदानाबाहेर एका कारमध्येही दिसला. त्यानंतर आता समोर आलं आहे की जसप्रीत बुमराहला काही दुखापत झाली आहे आणि त्याला टीम स्टाफसह स्कॅनिंगसाठी पाठवण्यात आले आहे.
जसप्रीत बुमराहने या मालिकेत आतापर्यंत ३२ विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत बुमराहने मैदान सोडणं हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. सिडनी कसोटीच्या या डावात बुमराहने आतापर्यंत १० षटकं टाकली आहेत आणि २ विकेटही घेतले आहेत. म्हणजेच या सामन्यातही तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहली आता कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. त्याचबरोबर गोलंदाजांची संपूर्ण जबाबदारी सिराज आणि प्रसीध कृष्णावर आली आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत प्रसिध कृष्णा आणि नितीश रेड्डीने चांगली गोलंदाजी करत विकेट घेतले आहेत.
हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने मोडला ४७ वर्षे जुना विक्रम, ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला नवा विक्रम
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने ५ विकेट्स मिळवले आहेत आणि ऑस्ट्रेलियाला १८१ धावांवर सर्वबाद करत भारताने ४ धावांची आघाडी मिळवली आहे. जसप्रीत बुमराह मैदानाबाहेर गेल्यानंतर दुसऱ्या सत्रातच भारताने ऑस्ट्रेलियाला सर्वबाद केलं आहे. दुसऱ्या सत्रात नितीश रेड्डी आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले आहेत तर सिराजने बोलँडला क्लीन बोल्ड करत १ विकेट मिळवली.