भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी गोलंदाज जसप्रीत बुमराहवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या यशस्वी कामगिरीने बुमरहाने आपल्याला चुकीचं सिद्ध केलं असल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आहे. कपिल देव यांनी गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीमुळे बुमराह जास्त काळ संघात टिकणार नाही असं भाकित वर्तवलं होतं.
बुमरहाच्या बॉलिंग अॅक्शनवर बोलताना कपिल देव यांनी म्हटलं की, ‘बुमरहाने मला चुकीचं सिद्ध केलं. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याची बॉलिंग अॅक्शन पाहून हा जास्त काळ टिकणार नाही असं वाटलं होतं, पण तो टिकला. त्याला माझा सलाम आहे. ऑस्ट्रेलियात त्याने जी कामगिरी केली आहे त्यासाठी त्याला शुभेच्छा. मानसिकरित्या तो फार सक्षम असावा’.
बुमराहचं कौतूक करताना कपिल देव यांनी त्याच्याकडे अनोखी शैली असल्याचं म्हटलं आहे. ‘मला वाटतं तो जबरदस्त खेळाडू आहे. इतक्या छोट्या रन-अपमध्ये जर तो सतत 140 हून अधिक वेगाने गोलंदाजी करत असेल तर तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे. त्याच्याकडे अनोखी शैली आहे. असे गोलंदाज विलक्षण असतात’, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.
‘जुन्या आणि नव्या दोन्ही चेंडूसोबत बुमराह चांगली गोलंदाजी करतो. त्याचे बाऊन्सर विरोधकांना आश्चर्यचकित करु शकतात. त्याची गोलंदाजी अचूक असून, चेंडू कुठे टाकायचा हे त्याला नीट माहिती आहे. गोलंदाजी करताना तो डोक्याचाही वापर करतो. या सर्व गोष्टींचं मिश्रण त्याला जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक बनवतं’, अशा शब्दांत कपिल देव यांनी बुमराहचं कौतूक केलं आहे.
बुमराहच्या रँकिंगमध्ये सुधार झाल्याचा भारतीय संघाला काही फायदा होईल का असं विचारलं असता कपिल देव यांनी सांगितलं की, ‘श्रीनाथदेखील बुमराहप्रमाणे कमी वेळात प्रकाशझोतात आला होता. झहीरला थोडा जास्त वेळ लागला. गोलंदाज चांगली कामगिरी करु लागले की त्याचा संघाला फायदा असतो. पण अनेकदा दुखापती अडथळा आणतात. यामुळे काहीजण कायमचे निघून जातात तर काहीजण मोहम्मद शामीप्रमाणे नव्या जिद्दीने परततात. दुखापतींमुळे नक्कीच गोलंदाजीत फरक पडतो’.
भारतीय संघ बुमराहवर जास्त अवलंबून आहे का असं विचारलं असता कपिल देव यांनी म्हटलं की, ‘संघात जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो तेव्हा संघ त्याच्यावर अवलंबून असतोच. त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही’.