गेल्या काही वर्षांमध्ये जसप्रीत बुमराह भारताचा प्रमुख गोलंदाज म्हणून नावारुपाला आला आहे. कसोटी असो टी-20 असो अथवा वन-डे क्रिकेट….बुमराहने आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर अनेक मोठ्या फलंदाजांची भंबेरी उडवली आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही बुमराहने महत्वपूर्ण कामगिरी बजावली. आगामी विश्वचषक लक्षात घेता बीसीसीआयने बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून विश्रांती दिली होती. आपल्या अचूक यॉर्कर चेंडूंमुळे बुमराहने अनेक फलंदाजांच्या यष्ट्या उडवल्या आहेत. या यॉर्कर चेंडूंमागचं रहस्य आता खुद्द बुमराहनेच उलगडलं आहे.
टेनिस बॉलने केलेल्या सरावामुळे आपले यॉर्कर चेंडू हे अधिक भेदक झाल्याचं बुमराहने सांगितलं. “लहान असताना मी अनेकदा टेनिस बॉलने क्रिकेट खेळलो आहे. त्यावेळी स्थानिक नियमांनुसार केवळ 1 यॉर्कर चेंडू टाकण्याची परवानगी असलायची. मग आपला हा चेंडू व्यवस्थित पडावा यासाठी मी मेहनत करायचो. सुरुवातीला विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळताना या गोष्टीचा विचार केला नाही. मात्र ज्यावेळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळी या यॉर्कर चेंडूचं महत्व अजुन समजलं.” टाईम्स ऑफ इंडियाशी बोलत असताना बुमराहने आपलं गुपित सांगितलं.
मात्र केवळ याच गोष्टींमुळे मी चांगला यॉर्कर चेंडू टाकतो अशातला भाग नाही. कित्येकदा मी एक चेंडू व्यवस्खित पडावा यासाठी अनेक तास मेहनत केली आहे. चेंडूचा टप्पा, दिशा यासारख्या अनेक गोष्टींवर मी आजही काम करतो. सामन्यात अटीतटीच्या प्रसंगांमध्ये जर तुम्हाला चांगली कामगिरी करायची असेल तर ही मेहनत घ्यावीच लागत असल्याचं बुमराह म्हणाला. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे, या मालिकेत बुमराह पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा – त्या क्षणी मी षटकार मारु शकेन याची खात्री वाटली होती – दिनेश कार्तिक