Jasprit Bumrah Ruled out of Champions Trophy BCCI Announced Updated Squad: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या काही दिवसांत सुरूवात होत आहे. पण या मोठ्या आयसीसी स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा होत्या. याबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली असून जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर झाला आहे. बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाल्याचे वृत्त बीसीसीआयने दिले आहे. याचबरोबर भारताचा सुधारित संघदेखील जाहीर केला आहे.
जसप्रीत बुमराहच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफी संघात कोणाला मिळाली संधी?
बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या खालच्या भागातील दुखापतीमुळे २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. निवड समितीने बुमराहच्या जागी हर्षित राणाचा संघात समावेश केला आहे. ही दुसरी आयसीसी स्पर्धा असेल ज्यात बुमराह दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. याआधी, पाठीच्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातूनही बाहेर पडला होता, यादरम्यान त्याला पाठीच्या दुखापतीवर अखेर शस्त्रक्रिया करावी लागली होती.
जसप्रीत बुमराहला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये अखेरच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. पण अखेरच्या सामन्यात बुमराहच्या पाठीमध्ये वेदना होत असल्याने सामन्याबाहेर पडला आणि पुन्हा गोलंदाजीसाठी उतरला नाही.
बीसीसीआयने बुमराहसह अजून एक मोठी अपडेट देखील दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या १५ सदस्यीय संघात यशस्वी जैस्वालच्या जागी फिरकीपटू वरूण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे. वरूण चक्रवर्तीला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी संघात संधी देण्यात आली आहे. सध्या वरूण चक्रवर्ती इंग्लंडविरूद्ध वनडे मालिकेत खेळत आहे, त्याला दुसऱ्या वनडेमध्ये भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली.
यशस्वी जैस्वाल भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेचा भाग आहे. यशस्वीने इंग्लंडविरूद्ध पहिल्या सामन्यात वनडेमध्ये पदार्पण केले. तर दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे त्याला बाहेर बसावे लागले. शुबमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. त्यामुळे टीम इंडिया याच सलामी जोडीसह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उतरणार आहे.
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व आठ संघांना अंतिम १५ खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी ११ फेब्रुवारी ही अंतिम तारीख दिली होती. यानंतर, कोणत्याही बदलांसाठी संघांना स्पर्धेच्या तांत्रिक समितीची परवानगी घ्यावी लागेल. बीसीसीआयने जानेवारीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. त्यावेळी इंग्लंडविरूद्ध संघात हर्षित राणाचा समावेश करण्यात आला होता. यानंतर इंग्लंडविरूद्ध पहिल्याच सामन्यात हर्षितला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच सामन्यात ३ विकेट्स घेत आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोख बजावली.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, 2025 साठी भारताचा सुधारित संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
पर्यायी खेळाडू:
यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे. गरज भासल्यास हे तिन्ही खेळाडू दुबईसाठी भारतीय संघात सामील होण्यासाठी रवाना होतील.