भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे आगामी टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या अशा स्वरूपाच्या बातम्या अनेक वृत्तसंस्थांमधून बाहेर आल्या होत्या. तशा प्रकारची अधिकृत माहिती देखील बीसीसीआयने ट्विटर ट्विट करून दिली होती. यावर आता जसप्रीत बुमराहच्या दुखापतीच्या वृत्तानंतर समाज माध्यमांमध्ये प्रतिक्रियांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. यातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा जुना व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. ज्यात शोएब अख्तर जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीवर भाष्य करतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शोएब अख्तरनं वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप आणि न्यूझीलंडचा दिग्गज शेन बॉन्ड यांचं उदाहरण देत म्हटलंय की,”भारत बुमराहला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळवू शकत नाही. कारण, बुमराहची अॅक्शन पाठीच्या दुखापतींना आमंत्रण देऊ शकतात. जवळपास एक वर्षापूर्वी एका टीव्ही चॅनलवर बोलताना शोएब पुढे असेही म्हणाला होता की, “बुमराहची बॉलिंग फ्रंटल अॅक्शनवर आधारित आहे. चेंडू फेकताना तो वेग निर्माण करण्यासाठी त्याच्या पाठीचा आणि खांद्याचा वापर करतो. तर आम्ही गोलंदाजी करताना साइड-ऑन असायचो आणि त्यामुळे पाठीवर जास्त दडपण येत नाही. बुमराहची फ्रंट-ऑन अॅक्शनमुळे त्याच्या पाठीवर जास्त दबाव येतो. तसेच, अख्तर म्हणाला, “मी बघितले आहे की बिशप त्याच्या पाठीशी झुंजत होता, शेन बॉन्डची देखील अशीच परिस्थिती होती आणि दोघांचीही फ्रंटल अॅक्शन होती.
अख्तरनं त्याच्या युट्युब व्हिडिओमध्ये बोलताना सांगितले की, “बुमराहला आता विचार करायला हवा. कारण तो सर्व क्रिकेटच्या सर्व प्रकारात आता खेळू शकणार नाही. त्याला मॅनेजमेंटची गरज आहे. जर तुम्ही बुमराह प्रत्येक सामन्यात खेळवले तर एका वर्षात तो पूर्णपणे तुटून जाईल. त्याला ५ पैकी ३ खेळवा आणि मग त्याला थोडीशी विश्रांती द्या. बुमराहला जास्त दिवस खेळवायचे असेल तर ही एक गोष्ट सांभाळावी लागेल”.
चाहते हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. तसेच, बुमराहच्या दुखापतीचा अचूक अंदाज वर्तवल्याबद्दल चाहत्यांनी अख्तरचे कौतुक केले. विशेष म्हणजे अख्तर हाच एकमेव नव्हता ज्याने बुमराहच्या लाँगटर्म करिअरवर शंका व्यक्त केली होती.