भारतीय संघाने नुकताच वेस्ट इंडिज दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला. या दौऱ्यात भारताने तीनही मालिकांमध्ये यजमान संघाला ‘व्हाइटवॉश’ दिला. कसोटी क्रिकेट मालिकेत तर भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने हॅटट्रिक घेत भारतीय संघाला विजय मिळवू दिला. बुमराहने कसोटी मालिकेत तब्बल १३ गडी टिपले. आगामी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी २० मालिकेतून त्याला वगळण्यात आले असले तरी त्याच्या गोलंदाजीची आफ्रिकन खेळाडूंकडून चर्चा केली जात आहे.
आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा जसप्रीत बुमराहबद्दल एका मुलाखतीत म्हणाला की प्रतिभासंपन्न गोलंदाजांचे मला नेहमीच कौतुक वाटते. आर्चरची प्रतिभावान गोलंदाजी ही त्याला मिळालेली दैवी देणगी आहे. तर बुमराहदेखील उत्तम गोलंदाज आहे. बुमराह गोलंदाजीत काहीही करू शकतो तो मैदानावर जादू घडवू शकतो. अशा गोलंदाजांमुळे चांगली कामगिरी करण्यासाठी हुरूप येतो.
पण त्याचबरोबर “प्रसारमाध्यमे काही गोलंदाजांना जरा जास्तच महत्व देतात. कोणताही गोलंदाज कायमस्वरूपी अव्वल राहू शकत नाही”, असे रबाडा बुमराहबद्दल बोलताना म्हणाला.
भारत दौऱ्याबाबतही त्याने मत व्यक्त केले. “कारकिर्द घडवणे हे सोपे नसते. कारकिर्दीत कायम चढ उतार असतात. प्रत्येक गोलंदाजाला जसे वाटत असते तसेच मलाही जगातील सर्वोत्तम खेळाडू व्हायचं आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यावर अशी स्पर्धा करावीच लागते. पण मी मालिकेबाबत किंवा क्रिकेट कारकिर्दीबाबत फारसा चिंताग्रस्त नाही. मी प्रत्येक सामना आनंदी मनाने खेळतो आणि पुढेही मी असाच खेळत राहणार आहे”, असे तो म्हणाला.