भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अँकर संजना गणेशन हिच्यासोबत सोमवारी विवाहबंधनात अडकला. गोव्यात जवळच्या नातेवाईक आणि खास मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बुमराहने आपले नाव मागे घेतले होते. आता आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बुमराह तयार झाला आहे. लग्नानंतरच्या ब्रेकनंतर तो या महिन्याच्या शेवटी मुंबई मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराहने सुरुवातीचे तीन सामने खेळले. त्यानंतर तो बीसीसीआयची परवानगी घेऊन बायो बबलमधून बाहेर पडला. टी-20 मालिकेनंतर आता उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. बुमराह या मालिकेतही नसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लग्नाच्या ब्रेकनंतर बुमराह आता 26 ते 28 मार्च दरम्यान मुंबई इंडियन्समध्ये दाखल होईल. चेन्नईला जाण्यापूर्वी तो एका आठवड्यासाठी क्वारंटाईन असेल. आयपीएल 2021चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईत खेळवला जाणार आहे. बुमराहव्यतिरिक्त संघातील अन्य भारतीय सदस्य थेट सामन्याचे स्थळ गाठणार आहेत. हे खेळाडू आधीच बायो बबलमध्ये होते. त्यामुळे ते आयपीएल खेळण्यासाठी थेट आपापल्या संघात सामील होतील.

बुमराहची 277.1 षटके

मागील वर्षी बुमराहने आयपीएलमध्ये 60 षटके गोलंदाजी केली. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया दौरा केला.  बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील तीन कसोटीनंतर दुखापतीमुळे तो चौथ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. बुमराहने गेल्या पाच महिन्यांत 277.1 षटके  टाकली आहेत.

कोण आहे जसप्रीतची पत्नी संजना?

संजना गणेशन ‘स्प्लिट्स व्हिला ७’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. या शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडल होती. संजनाने ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जियस’ हा किताब जिंकला होता. त्यानंतर 2012 मध्ये तिने ‘फेमिना स्टाइल दिवा’मध्ये भाग घेतला होता. 2014 मध्ये संजना ‘फेमिना मिस इंडिया पुणे’ या स्पर्धेची फायनलिस्ट ठरली होती. संजनाने 2019मध्ये क्रिकेट विश्वचषकात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर ‘मॅच पॉईंट’ शोचे सुत्रसंचालन केले होते.

Story img Loader