भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने टी२० विश्वचषक २०१६ मध्ये विंडीजविरुद्ध नो बॉलवर सलामीवीर सिमन्सला बाद केले. पण नो बॉल असल्याने सिमन्सला बाद देण्यात आले नाही आणि पुढे याच सिमन्सने वादळी खेळी करून भारताला पराभूत केले. तेव्हापासून सुरु झालेले बुमराहमागचे शुक्लकाष्ठ अद्यापही संपण्याचे नाव घेत नाही. २०१७ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही अशाच प्रकारच्या ‘नो-बॉल विकेट’ला बुमराहला सामोरे जावे लागले होते. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या दौऱ्यातील शेवटचे २ कसोटी सामने शिल्लक आहेत. पण जसप्रीत बुमराहमागील नो बॉलचे शुक्लकाष्ठ या मालिकेतही सुरूच आहे. आजपासून या मालिकेतील चौथा सामना सुरु झाला आहे. पण गेल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही भारताच्या जसप्रीत बुमराहने नो बॉल वर बळी टिपला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुमराहच्या चेंडूवर कर्णधार जो रूट पायचीत झाल्याचे अपील भारतीय खेळाडूंनी केले. पण पंचांनी त्याला नाबाद ठरवल्यानंतर भारताने DRSचा वापर केला. पण या DRSमध्ये बुमराहने नो बॉल टाकल्याचे निष्पन्न झाले आणि भारताने मिळविलेली संधी गमावली. सोबतच रिव्ह्यूदेखील फुकट गेला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाचव्या दिवशी संपला. हा सामना भारताने २०३ धावांनी जिंकला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ९ बळी गमावले होते. एका बळीसाठी पाचव्या दिवसाचा खेळ खेळावा लागला होता. हा सामना चौथ्या दिवशीच संपू शकला असता, पण जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एक गडी बाद झाला असताना तो नो बॉल असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यावेळी बुमराहवर सोशल मीडियावरून टीका झाली होती. आजही या नो बॉलनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियातून त्याच्यावर टीका झाली. तसेच तो विनोदाचा विषयही ठरला.

 

 



मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah trolled by internet users after no ball wicket in 4th test