भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली एजबस्टन कसोटी रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. या सान्यातील सुरुवातीचे तिन्ही दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवले. दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने धमाकेदार कामगिरी केली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याने फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी केली. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा फटकावल्या. शिवाय गोलंदाजी करतानाही तीन बळी मिळवले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कोतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, एका व्यक्तीने बुमराहचे कौतुक करण्याऐवजी त्याच्या कामगिरीचे श्रेय लुटण्याचा प्रयत्न केला आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्याची पत्नी संजना आहे.
एजबस्टन कसोटीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराहने अवघ्या १६ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. यापूर्वी, लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने महत्त्वाची खेळी केली होती. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील आठ डावांत त्याने ११८ धावा केल्या आहेत. अलीकडच्या काळात त्याने ज्याप्रकारे आपली फलंदाजी सुधारली आहे त्यामुळे अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याबाबत त्याची पत्नी आणि स्पोर्ट्स प्रेझेंटटर असलेल्या संजना गणेसनला विचारणा करण्यात आली. हा बदल आपल्यामुळे झाल्याचे ती म्हणाली आहे.
आयसीसीच्या एका रिव्ह्यू कार्यक्रमामध्ये संजना आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांनी बुमराहच्या कामगिरीबाबत चर्चा केली. संजनाला बुमराहच्या गोलंदाजीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने काहीही सांगितले नाही. ती म्हणाली, “मी सध्या फक्त बुमराहच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करत आहे. तिथे जे काही घडले ते माझ्यामुळे झाले आहे.”
संजनाने पुढे असेही सांगितले की, ‘जसप्रीतची आई केव्हाही क्रिकेट खेळलेली नाही. पण, तरीही ती आपल्या मुलाला टिप्स आणि युक्त्या सांगत असते. त्याच्या कामगिरीबाबत सर्व कुटुंबिय नेहमीच फार उत्साही असतात.’