Jasprit Bumrah won ICC Award: जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३२ विकेट्स घेतले. ऑस्ट्रेलियाविरूद्ध एखाद्या कसोटी मालिकेत ३२ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एकामागून एक विकेट्स घेत संघाला वारंवार सामन्यात परत आणले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील या उत्कृष्ट कामगिरीचं बुमराहला आयसीसीकडून पारितोषिक मिळालं आहे.
जसप्रीत बुमराहने डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर २०२४ चा पुरस्कार पटकावला आहे. बुमराहने पॅट कमिन्स आणि डेन पॅटरसनला मागे टाकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. बुमराहने डिसेंबरमध्ये खेळवल्या गेलेल्या ३ कसोटींमध्ये १४.२२ च्या प्रभावी सरासरीने सर्वाधिक २२ विकेट्स घेतले आणि एकट्याने भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्त्व केले. जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडची डिसेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
बुमराहने डिसेंबर महिन्यातील ॲडलेड कसोटीत ४ विकेट्स घेतल्या होत्या. ब्रिस्बेन कसोटीत त्याला ९ विकेट घेण्यात यश आले. त्याने पहिल्या डावात ६ विकेट घेतल्या. मेलबर्न कसोटीतही बुमराहच्या भेदक गोलंदाजीने सर्वांनाच चकित केलं आणि त्याने पुन्हा ९ विकेट घेतल्या. यावेळी बुमराहने दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहला त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील उत्कृष्ट कामगिरीसाठी मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला होता.
जसप्रीत बुमराहने जून २०२४ मध्ये पहिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला होता. २०२४ मध्ये दोनदा प्लेअर ऑफ द मंथ जिंकणारा बुमराह हा जगातील एकमेव गोलंदाज आहे. टीम इंडियाबद्दल बोलायचं तर २०२४ मध्ये फक्त दोन भारतीय खेळाडूंनी प्लेअर ऑफ द मंथ जिंकले. बुमराह व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल हिने ही कामगिरी केली होती. फेब्रुवारी महिन्यात तो प्लेअर ऑफ द मंथ ठरला.
जसप्रीत बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज आहे ज्याने वर्षभरात दोनदा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. हा पुरस्कार २०२१ मध्ये सुरू करण्यात आला आणि तेव्हापासून केवळ बुमराहने ही कामगिरी केली आहे. मात्र, शुबमन गिलने एका वर्षात दोन आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारही जिंकले आहेत. २०२३ मध्ये शुबमन गिलने हा पुरस्कार दोनदा जिंकला होता.