भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणला, की संपूर्ण देशातील क्रिकेटप्रेमी हे टिव्ही समोर चिकटून बसतात. दोन्ही संघातील खेळाडूंमधल्या द्वंद्वाचीही या सामन्यांदरम्यान चांगलीच चर्चा होते. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियादाद यांना ‘मवाली खेळाडू’ असं म्हटलं आहे. पुण्यात अथश्री फाऊंडेशनकडून सुनिल गावसकर यांचा आज जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुण्याच्या कलमाडी हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी गावसकरांची मुलाखत घेतली, यावेळी बोलत असताता गावसकरांनी आपल्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पाकिस्तानचे खेळाडू हे स्लेजिंग करण्यामध्ये माहिर होते. समोर कोणताही खेळाडू असला तरीही ते त्याला सोडत नसतं. जावेद मियादाद यामध्ये आघाडीवर असायचा. यावेळी सुनंदन लेले यांनी गावसकरांना तुम्हाला कोणत्या खेळाडूचा त्रास झाला असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना गावसरकरांनी मियादाद यांचं नाव घेतलं. “जावेद मियादाद हा माझ्या कारकिर्दीत मी पाहिलेला मवाली खेळाडू होता. सतत समोरच्या खेळाडूचं लक्ष विचलीत करण्यासाठी काही ना काही बोलत रहायचं हे त्याची सवय होती, आणि अनेकदा तो यात यशस्वीही व्हायचा.”

माझ्या कारकिर्दीचा शेवटचा कसोटी सामना मी पाकिस्ताविरुद्ध खेळलो. मात्र दुर्दैवाने आम्हाला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. यानंतर मला सामना गमावल्याचं प्रचंड दु:ख झालं होतं. पाकिस्तानी संघाचं ड्रेसिंग रुम आमच्या शेजारी होतं. त्यांच्या संघाचं अभिनंदन करण्यासाठी मी व माझे सहकारी त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये गेलो, त्यावेळी मियादादचं जंगी सेलिब्रेशन सुरु होतं. यावेळी जावेदने माझी माफीही मागितली. गावसकर यांनी भारत-पाकिस्तान सामन्यातील अनेक किस्से उलगडवून दाखवले.

Story img Loader