पाकिस्तानपेक्षा अधिक प्रेम आम्ही भारतात अनुभवतो, ही कर्णधार शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया धक्कादायक आणि भावना दुखावणारी आहे. त्यामुळे खेळाडूंची अशा प्रकारची वक्तव्ये ही शरम वाटावी अशी आहेत, अशा शब्दांत पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी संताप व्यक्त केला आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतात पोहोचल्यावर आफ्रिदी आणि अनुभवी खेळाडू शोएब मलिक यांनी भारतावर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. भारतात खेळताना आम्हाला कधीच भीती वाटली नाही. फक्त सुरक्षेच्या चिंतेमुळे भारतात येण्यास विलंब झाला, अशी ग्वाही या दोघांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली होती.
‘‘भारतात खेळताना आम्हाला नेहमीच आनंद वाटतो, कारण पाकिस्तानपेक्षा भारतातील चाहत्यांकडून आम्हाला अधिक प्रमाणात प्रेम मिळाले आहे,’’ असे आफ्रिदीने रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. यावर एका टेलिव्हिजन वाहिनीवर भाष्य करताना मियाँदाद म्हणाला, ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात गेला आहे. याचा अर्थ असा नव्हे, की खेळाडूंनी यजमानांचे गुणगान गायला हवे.’’
‘‘गेल्या पाच वर्षांत भारताने आपल्याला किंवा पाकिस्तानच्या क्रिकेटला काय दिले आहे? हे सत्य भारतात सांगावे. पाकिस्तान क्रिकेटची अनेक वष्रे सेवा करताना आपल्या खेळाडूंच्या वक्तव्यांनी मी दुखावलो आहे,’’ असे मियाँदाद म्हणाला.
पाकिस्तानचे माजी कसोटीपटू मोहसिन खान यांनीही दोघांच्या वक्तव्यांबाबत आश्चर्य प्रकट केले. ‘‘आफ्रिदी आणि मलिक हे दोघेही संघातील अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे विशेषत: भारतात असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काळजी घ्यायला हवी,’’ असे खान यांनी सांगितले.

आफ्रिदीला नोटीस
लाहोर : पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम भारतात अनुभवतो, या वक्तव्यामुळे शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. पाकिस्तानमधील वकिलाने याबाबत आफ्रिदीला कायदेशीर नोटीसच बजावली आहे. ‘‘आफ्रिदी व पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे पदसिद्ध कार्याध्यक्ष नजम सेठी यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी आफ्रिदीच्या वक्तव्याची चौकशी करावी, असे पत्रही लिहिले आहे,’’ अशी माहिती वकिल अझर सिद्धीकी यांनी दिली.

सराव सामने
पाकिस्तानचा श्रीलंकेवर विजय
कोलकाता : मोहम्मद हाफिझच्या फटकेबाजीनंतर इमाद वसीम व मोहम्मद इरफान यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने सराव सामन्यात श्रीलंकेवर १५ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी १५८ धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला २० षटकांत ९ बाद १४२ धावांवर समाधान मानावे लागले. हाफिझने ४९ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ७० धावा केल्या.
मुंबई अध्यक्षीय संघाने इंग्लंडला झुंजवले
मुंबई : मुंबई अध्यक्षीय संघाने सोमवारी खेळण्यात आलेल्या सराव सामन्यात इंग्लंडला विजयासाठी चांगलेच झुंजवले. मात्र जय बिस्ता व जेम्स विन्स यांच्या चिवट खेळानंतरही मुंबईला १४ धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंडच्या १७७ धावांचा पाठलाग करताना मुंबई अध्यक्षीय संघाने १६३ धावांपर्यंत मजल मारली.

Story img Loader