How Many Medals Neeraj Chopra Won : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ या स्पर्धेला २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारताने ११७ सदस्सीय तगडा संघ पॅरिस ऑलिम्पिकच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वांकडून भारतीय जनतेला पदकांची आशा आहे. मात्र, या सर्वात जास्त अपेक्षा २६ वर्षीय भालाफेकपटू ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राकडून आहेत. कारण ऑलिम्पिक असो, कॉमनवेल्थ गेम्स असो किंवा आशियाई गेम्स, प्रत्येक वेळी त्याच्या भालाफेकने पदकाचा अचूक वेध घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात भालाफेकची पातळी लक्षणीयरीत्या उंचावली. अलीकडेच, त्याने दुखापतीच्या दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन केले आहे आणि पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारतीय स्टार ॲथलीट नीरज चोप्राला जवळपास प्रत्येक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची सवय झाली आहे. नीरज चोप्राने २०१६ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक मिळवायला सुरुवात केली. त्यावेळी तो अवघ्या १९ वर्षांचा होता. ज्या वयात भारतातील तरुण आपल्या करिअरचा फारसा विचार करू शकत नाहीत. त्या वयात नीरजने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हापासून नीरज चोप्राने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि मोठ्या स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकत राहिला आहे.
२०२१ या वर्षाने त्याच्या कारकिर्दीत सर्वात मोठे वळण घेतले. जेव्हा त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले होते. या पदकाने करोडो भारतीय चाहत्यांना आशा दिली की भारत या खेळांमध्येही चांगली कामगिरी करू शकतो. त्यामुळे आज आपण ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने आतापर्यंत एकूण किती पदके जिंकली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने आतापर्यंत जिंकलेली पदके –
१.दक्षिण आशियाई क्रीडा २०१६ मध्ये सुवर्ण
२.आशियाई चॅम्पियनशिप २०१७ मध्ये सुवर्ण
३.कॉमनवेल्थ गेम्स २०१८ मध्ये सुवर्ण
४.आशियाई खेळ २०१८ मध्ये सुवर्ण
५.टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्ण
६.आशियाई खेळ २०२२ मध्ये सुवर्ण
७.डायमंड लीग २०२२ मध्ये सुवर्ण
८.वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२२ मध्ये रौप्य
९.वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्ण
१०.डायमंड लीग २०२३ मध्ये रौप्य
भालाफेक खेळ ऑलिम्पिकमध्ये कधी सामील झाला?
इ.स.पूर्व ७०८ मध्ये प्राचीन ऑलिम्पिक खेळांमध्ये भालाफेकचा समावेश करण्यात आला होता, परंतु त्या वेळी भालाफेक हा एक स्वतंत्र खेळ नव्हता तर बहु-स्पोर्ट पेंटॅथलॉन स्पर्धेचा भाग होता. पण १९०८ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भालाफेकला आधुनिक ऑलिम्पिक खेळांचा भाग बनवण्यात आले. १९३२ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये महिला भालाफेकने पदार्पण केले. २०२१ मध्ये भारताने या स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले.