Neeraj Chopra injured during training : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा २८ मे रोजी ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक २०२४ मध्ये सहभागी होणार नाही. याबाबत दुजारा देताना आयोजकांनी सांगितले की, दुखापतीमुळे तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. मात्र, तो या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. अलीकडेच चोप्राने दोहा डायमंड लीग आणि फेडरेशन कपमध्ये भाग घेतला होता. त्याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राकडून देशाला पदकाची सर्वात मोठी आशा आहे. आता त्याच्या दुखापतीमुळे चिंता वाढली आहे.
नीरज चोप्राला कुठे दुखापत झाली?
नीरज चोप्राला त्याच्या ॲडक्टर स्नायूंना दुखापत झाली आहे. हे स्नायू मांडीच्या आतील भागात असतात. नीरजची तपासणी केली जात असून त्यानंतर रिहॅबिलिटेशनची प्रक्रिया सुरू करता येणार आहे. नीरज चोप्रा २८ मे रोजी होणाऱ्या ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक मीटमध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा होती, पण या दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेती माघार घ्यावी लागली आहे.
नीरज चोप्राला कशी झाली दुखापत?
दोन आठवड्यांपूर्वी प्रशिक्षणादरम्यान नीरज चोप्रा जखमी झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तो ओस्ट्रावामध्ये भालाफेक करू शकणार नाही. नीरज चोप्राने भुवनेश्वरमध्ये पुरुषांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत ८२.२७ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकले होते. बुधवारी, १५ मे रोजी कलिंगा स्टेडियमवर चार थ्रो केल्यानंतर ऑलिम्पिक चॅम्पियन थांबला. हा थ्रो त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम ८८.९४ मीटरपेक्षा खूपच कमी होता, जो त्याने २०२२ मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये केला होता.
कार्यक्रमाला पाहुणा म्हणून उपस्थित राहणार –
आयोजक म्हणाले, “दोन आठवड्यांपूर्वी प्रशिक्षणादरम्यान त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रावामध्ये भालाफेक करु शकणार नाही, परंतु तो या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून उपस्थित राहील. १० मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये ८८.३६ मीटरच्या प्रभावी थ्रोसह रौप्य पदक जिंकून २०२४ च्या हंगामाची जोरदार सुरुवात केली. यानंतर जवळपास तीन वर्षांनंतर तो देशांतर्गत स्पर्धेत परतला आणि १५ मे रोजी फेडरेशन कपमध्ये ८२.२७ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते.