भारतातील अव्वल भालाफेकपटूंपैकी एक असलेल्या शिवपाल सिंगला गेल्या वर्षी उत्तेजक द्रव्य चाचणीत अपयशी ठरल्याबद्दल नाडा (नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी) च्या डोपिंग विरोधी शिस्तपालन समितीने चार वर्षांसाठी खेळातून निलंबित केले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्यानंतर भारताचा दुसरा सर्वात यशस्वी भालाफेकपटू असलेला शिवपाल सिंग याची कारकीर्द संकटात सापडली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या शिवपालला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्पर्धाबाह्य चाचणीत अपयश आल्यामुळे तात्पुरत्या निलंबनात ठेवण्यात आले होते. त्याच्या नमुन्यात बंदी घातलेल्या पदार्थाची पुष्टी ही मेथेंडिएनोन होती. स्टेरॉइड मेथेंडिएनोन चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला. टोकियो ऑलिम्पिकमधील पात्रता फेरीत शिवपाल २७ व्या स्थानावर राहिला. ऑक्टोबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत त्याचे निलंबन राहील.
टोकियो ऑलिम्पिकनंतर राष्ट्रीय शिबिर नसताना शिवपालची चाचणी घेण्यात आली. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत झालेल्या शिबिरासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव होते. मात्र यंदा शिबिराची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याने त्यांचे नाव वगळण्यात आले. शिवपालने दोहा येथील २०१९ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये ८६.२३ मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले, जे त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम प्रयत्न होता. त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील दुसऱ्या पात्रता गटात ७६.४० मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह १२ वे आणि एकूण २७ वे स्थान पटकावले. ऑलिम्पिकनंतर त्याने कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नाही.
हेही वाचा : IND vs SA: सूर्याच्या वादळी खेळीने आणखी एक रचला इतिहास, ग्लेन मॅक्सवेलचा तोडला विक्रम
शिवपालने आपल्या खेळाने अनेकदा संपूर्ण देशाची मान उंचावली होती. नीरजसोबत तो तरुण खेळाडूंचा आयडॉल ठरलेला. भारतीयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एकदा मन की बातमध्ये त्यांचे कौतुक केले होते. मात्र, त्याच्यावर आता कारवाई झाल्याने अनेकांची वेगळी प्रतिक्रिया येत आहे.