झेव्हियर हर्नाडेजने या आठवडय़ात दुसऱ्यांदा रिआल माद्रिदच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. हर्नाडेजने दोन गोल करून माद्रिदला सोमवारी ला लिगा फुटबॉल स्पध्रेत केल्टा डी व्हिगो संघावर ४-२ असा दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयामुळे माद्रिदने गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या बार्सिलोना संघामधील दोन गुणांचे अंतर कमी केले आहे. बार्सिलोना ८१ गुणांसह अव्वल, तर माद्रिद ७९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
सामन्याच्या ९व्या मिनिटाला नोलिटोने यजमान व्हिगो संघासाठी पहिला गोल केला. मात्र, हा आनंद त्यांना फार काळ उपभोगता आला नाही. १६व्या मिनिटाला टोनी क्रूस आणि २४व्या मिनिटाला झेव्हियर हर्नाडेज यांनी गोल करून माद्रिदला ०-१ अशा पिछाडीवरून २-१ अशी आघाडी मिळवून दिली. चार मिनिटांत माद्रिदला सडेतोड उत्तर मिळाले. २८व्या मिनिटाला व्हिगोच्या सँटी मिनाने गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला. दोन्ही संघांच्या गोल धमाक्यामुळे सामना कुणाच्या बाजूने झुकेल याचा अंदाज बांधणे अवघडच झाले होते. ४३व्या मिनिटाला जेम्स रॉड्रिग्जने गोल करून माद्रिदला मध्यंतरापर्यंत ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरानंतर व्हिगो संघाचा खेळ संथ झाला आणि माद्रिदने वर्चस्व गाजवले. ६९व्या मिनिटाला हर्नाडेजने सामन्यातील दुसऱ्या गोलची नोंद करून माद्रिदची आघाडी ४-२ अशी भक्कम केली. माद्रिदने ती अखेपर्यंत कायम राखत विजय निश्चित केला. ‘‘याच प्रकारच्या खेळाची आम्हाला अपेक्षा होती.’’ असे मत माद्रिदचे प्रमुख कार्लो अँसेलोटी यांनी व्यक्त केले.

रिअल माद्रिदसोबत खेळण्याचा आनंद मनसोक्त लुटतोय. देवाचे आभार. या संघासाठी पुढल्या वर्षी खेळण्याची संधी मिळेल की नाही कल्पना नाही. जेवढी मिनिटे खेळायला मिळतील, त्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.
-झेव्हियर हर्नाडेज

Story img Loader